पंजाबी गाण्यांमध्ये लँबोर्गीनी कार बघून देशात अनेक तरुणांना आपल्याकडे पण लँबोर्गीनी असावी असे वाटते. पण या कारसाठी पैसाही मजबूत मोजावा लागतो. पण जर स्वप्न बघितले तर त्यासाठी मार्ग पण सापडतो असे म्हटले जाते. ही गोष्ट आसाममधल्या एका मॅकेनिकने सिद्ध केली आहे. पठ्ठ्याने चक्क आपली मारुती स्विफ्ट लँबोर्गीनीमध्ये बदलून दाखवली आहे.
आसाममधील करीमगंज येथे नरुल हक नावाचा ३१ वर्षीय मोटर मॅकेनिक राहतो. भावाला हौस होती लँबोर्गीनीची पण बजेट नव्हते. मग काय तो कामाला लागला आणि मारुती स्विफ्टचे रूपांतर लँबोर्गीनीमध्ये केले. आपल्या गॅरेजमध्ये काम सुरू करत त्याने ८ महिने सतत काम केले. ६ लाख रुपये या कामासाठी त्याला खर्च आला. शेवटी त्याने स्वतःचे स्वप्न पूर्ण केले.
नरुलचे वडीलपण मॅकेनिक असल्याने त्याचा लहानपणापासून या कामात चांगला हात आहे. नरुल फास्ट अँड फ्युरियसचा फॅन आहे. या सिनेमांमध्ये दाखवलेल्या कार्स आपल्याकडे पण असाव्यात असे त्याला नेहमी वाटत असे. गेल्यावर्षी लॉकडाऊन लागल्याने त्याला घरी बसावे लागले होते.





