काळाच्या ओघात शिकण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. खूप पूर्वी म्हणजे अगदी जुन्या मराठी सिनेमात झाडाखाली किंवा एखाद्या मंदिरात एकाचवेळी दोन-चार वर्ग भरायचे आणि आता मोबाईल-लॅपटॉपवर शाळा भरत आहेत. गेल्या काही दशकांत शिकवण्या किंवा क्लासेसही शाळांइतक्याच महत्त्वाच्या झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी चाटे क्लासेसचा दबदबा होता, आता नावं बदलली असली तरी शाळेइतकंच महत्त्व या कोचिंग क्लासेसना आहे. सुपर ३० किंवा कोटा फॅक्टरी पाह्यली असेल तर तुम्हांलाही हे जाणवलं असेलच म्हणा!!
पण पाहायला गेलं तर कोचिंग इन्स्टिट्यूट हा शिक्षक आणि प्रशिक्षक यांतील फरक स्पष्ट करणारा पर्याय. अनेक कोचिंग क्लासेसच्या जाहिराती आणि कॅप्शन्स हेच सुचवतात. आज आम्ही तुम्हांला अशाच एका कोचिंग इन्स्टिट्यूटच्या जन्माची कथा आणि नावाप्रमाणेच sky is the limit ही सिद्ध केलेली यशोगाथा सांगणार आहोत. हे कोचिंग इन्स्टिट्यूट आहे 'AESL' अर्थात 'आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड'. या कोचिंग इन्स्टिट्यूटच्या शाखा व फ्रँचायजींचे जाळे आज भारतभर पसरले आहे. सर्व कोचिंग क्लासेसच्या भाऊगर्दीत हेच क्लासेस बोभाटाने का निवडले? कारण हे क्लासेस आज ट्रेंडिंग न्यूजमध्ये आहेत. 'बायजू'ज' सारख्या शिक्षणक्षेत्रातल्या आघाडीची कंपनीने ही कोचिंग इन्स्टिट्यूट तब्बल $1 बिलियन डॉलर देऊन टेक-ओव्हर केल्याची बातमी आज सगळीकडे झळकत आहे.









