बालपणी केलेली कुठली खोडी किंवा चूक कधी अंगाशी येईल सांगता येत नाही. मोठ्यांचे लक्ष चुकवून किंवा त्यांच्या नकळत मुलं असे काही करतात की सगळ्यांची पळता भुई थोडी होते. लहान मुलं किती गोड असतात हे अगदी खरं असलं तरी खोडसाळपणात म्हणा किंवा उत्सुकतेत, ती अशी काही कामगिरी करतात की डायरेक्ट डॉक्टरकडे पळावं लागतं. उदाहरण सांगायचं झालं तर नाकात घातलेले शेंगदाणे, छोटंसं नाणं किंवा सायकलचं बेअरिंग बॉल, कानात घातलेला खोडरबर किंवा छोटा खडा हे असे अनेक उद्योग आपण सगळ्यांनी केले असतीलच की. त्यानंतर ते बाहेर काढण्यासाठी केलेले घरगुती प्रयत्न आणि नाहीच जमले तर डॉक्टरांची भेट ठरलेलीच. हे सगळं संपल्यावर मिळणारा ओरडा हा प्रत्येकाला परिचयाचा असेलच. हो ना?
पण अशीच एखादी वस्तू शरीरात गेलीय आणि ते कळलंच नाही तर? काय होईल? ती वस्तू अनेक वर्षे शरीरातच राहिली तर? अशक्य वाटतंय ना? पण असं खरोखर झालंय. रशियामध्ये एका ५९ वर्षांच्या वृद्ध माणसाच्या नाकातून तब्बल ५० वर्षांनंतर नाणं काढण्यात आले आहे. आहे की नाही धक्कादायक? चला वाचूया सविस्तर..







