यावर्षीच्या जानेवारीमध्ये शेमारू कंपनीने 'शेमारू मराठी बाणा' या नव्या मराठी चित्रपट चॅनेलची घोषणा केली. पण मराठी बाणा हे नाव मराठी जनतेला नवीन नव्हतं. अशोक हांडे या नावाने गेली कित्येक वर्षे मराठी संस्कृतीचा आणि ती जपणाऱ्या मराठी गाण्यांचा कार्यक्रम करत आहेत. अर्थातच त्यांनी या चॅनेलच्या नावाला आक्षेप घेतला आणि शेमारूविरुध्द २०० कोटींचा दावा ठोकला. संगीताच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे त्यांचा 'मराठी बाणा' कार्यक्रम मराठी रसिकांच्या मनाला रिझवतो आहे. त्यामुळे 'मराठी बाणा' हा शब्द शेमारू कंपनीला व्यापारी उत्पादनासाठी वापरता येणार नाही असा त्यांचा दावा होता. हा शब्द त्यांच्या 'चौरंग' या संस्थेमार्फत 'ट्रेडमार्क' म्हणून नोंदणी केला आहे. त्यामुळे शेमारूला हा शब्द वापरण्यास कोर्टाने निर्बंध घालावेत असा या खटल्याचा आशय होता. हायकोर्टाने अशोक हांडे यांचा दावा सध्या तरी नाकारला आहे.
असो, या खटल्याचं काय होईल हे पुढे आपल्याला दिसेलच, पण या अनुषंगाने ट्रेडमार्क,पेटंट, कॉपीराईट आणि इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. अमुक एक शब्द -अमुक एक वाक्य - अमुक एक रंग यावर नक्की हक्क कोणाचा यावरून अनेक विवाद कोर्टात होत असतात. या विवादासाठी ट्रेड्मार्क, पेटंट, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट असे अनेक कायदे आहेत. पण हक्कासाठी दावे चालतच असतात. आता या शब्दांगर्तगत काय येतं हे आपण पुन्हा कधीतरी पाहूच, आणि आज फक्त ट्रेडमार्कबद्दल बोलू.










