गेली पंचवीस वर्षे 'बाह्यतंत्राचा वापर करून अपत्यप्राप्ती' करून देण्याचे विज्ञान ज्याला Assisted Reproductive Technology असे म्हणतात ते प्रायोगीक तंत्र न राहता यशस्वी तंत्र झाले आहे. याच तंत्राने जगातली दुसरी आणि भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी १९७८ साली जन्माला आली होती.
१९८६ साली मुंबईच्या केइएम इस्पितळात हर्षा चावडा या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाल्यावर या तंत्राला इतकी प्रसिध्दी मिळाली की तंत्र विकसित होण्यासोबतच जागोजागी खाजगी In-vitro fertilisation (IVF) सेंटर सुरु झाली. या तंत्राचे कौतुक करावे तितके कमीच आहे. पण यासोबतच एक काळा व्यापारही देशात फोफावत गेला तो म्हणजे स्त्री बीजांडे, पुरुष शुक्राणू आणि पैशासाठी चालणारा सरोगसीचा व्यापार!
बॉलीवूडचे 'चोरी चोरी चुपके चुपके' आणि 'विक्की डोनर' सारखे अनेक चित्रपट मनोरंजन म्हणून यशस्वी झाले असतील, पण प्रत्यक्ष परिस्थिती यापेक्षा फारच गंभीर आहे. एकेकाळी स्थानिक पातळीवर असलेला हा व्यवहार आंतराष्ट्रीय पातळीवर गेला आहे.











