पूर्वेस सोमाली समुद्र, नैऋत्येस केनिया, तर पश्चिमेस इथिओपिया या सीमांनी वेढलेला आफ्रिका खंडातील देश म्हणजे सोमालिया. एका बाजूला काटेरी झुडूपांची सवानाची रम्य भूमी, तर दुसर्या बाजूला निमवाळवंटी प्रदेशाचे लेणे लाभलेला हा देश. उंच पर्वतरांगा, विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि खोल दर्या असे सगळे पॅकेज असलेल्या या देशाचा इतिहासही अतिशय प्राचीन आहे. हा इतिहास आपल्याला थेट अश्मयुगापर्यंत घेऊन जातो. १९६० मध्ये नैऋत्य सोमालियात उत्खननादरम्यान मिळालेल्या काही कुर्हाडी सुमारे ३० लाख वर्षांपूर्वी बनवल्या गेल्याचा अंदाज आहे.
या सोमालियात राहणारी बहुसंख्य जनता ही मुस्लिम धर्मिय आहे. इथले लोक भटके जीवन जगतात. इथल्या अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. अशाच एका भटक्या जमातीतल्या ११ मुलांच्या कुटुंबात १९६५ मध्ये वारीस डायरीचा जन्म झाला. अगदी लहान असल्यापासूनच तिचा नशिबाशी झगडा सुरू झाला. अवघी १३ वर्षांची असताना ६० वर्षांच्या माणसाशी विवाह करावा लागू नये म्हणून ती घरातून पळून गेली. तशी पळून जायला तिला तिच्या आईनेच मदत केली म्हणा. पण यानंतर तिच्या संकटात आणखीनच भर पडली.










