२०२० वर्षं संपतच आले म्हणावे की संपुष्टात आले आहे म्हणावे, अशी सध्याची परिस्थिती आहे. एरवी या तीन महिन्यांत येणार्या वर्षाच्या कॅलेंडर-डायर्या छापणार्या कंपन्या आणि त्यांचे ग्राहक खडबडून जागे होऊन कामाला लागायचे. नवनव्या कल्पना 'थीम' आखल्या जायच्या. त्यानुसार कलाकार शोधले जायचे. इतरांपेक्षा आपल्या कंपनीची डायरी-कॅलेंडरं काही वेगळी आणि लोकप्रिय व्हावी यासाठी धडपड सुरु व्हायची. कंपन्यांसाठी नवे वर्षं हा 'ब्रँडींग' साठीची पर्वणी असायची. अमुक एका कंपनीची डायरी आपल्याला मिळावी म्हणून ऑफीसात 'सेटींग' लावली जायची.
गेल्या काही वर्षांत भिंतीवर लावायच्या कॅलेंडरची मागणी खूपच कमीच झाली होती, पण डायरीचे मार्केट मात्र आहे तसंच होतं. या वर्षी बहुतेक कंपन्या डायर्या छापतील का नाही ही शंकाच आहे. डायर्या छापल्या तर किती छापतील कुणास ठाऊक! भारत सरकारने यावर्षी डायरी कॅलेंडरवर खर्च करायचाच नाही असं ठरवलं आहे. हाच निर्णय सार्वजनीक क्षेत्रातील उद्योगांना लागू केला गेला आहे. आमच्या 'बोभाटा'च्या लायब्ररीत काही खास डायर्या जपून ठेवल्या आहेत. त्यापैकी एका डायरीतील काही खास चित्रं आज तुमच्यासमोर मांडत आहोत.















