कॅप्टन दिलीप दोंदे: स्वतःच जहाज बांधून एकट्याने जगपरिक्रमा करणारा भारताचा कोलंबस!!

लिस्टिकल
कॅप्टन दिलीप दोंदे: स्वतःच जहाज बांधून एकट्याने जगपरिक्रमा करणारा भारताचा कोलंबस!!

समुद्रालाटांवर स्वार होऊन जगपरिक्रमा करणे हे एखाद्या दर्यावर्दीचे स्वप्न असते. एकट्याने होडीतून सर्व महासागर पार करणे हे अजिबात सोपे नाही. पण हा प्रवास करणारा पहिला भारतीय सर्वाना माहीत आहे काय? भारताचा कोलंबस म्हणून ओळख असलेले कॅप्टन दिलीप दोंदे यांच्याविषयी आज आपण जाणून घेऊयात. कॅप्टन दोंदे हे रिटायर्ड नेव्ही ऑफिसर आहेत. हे पहिले भारतीय आहेत ज्यांनी समुद्रातून विश्वभ्रमंती केली आहे. त्यांच्या सागर परिक्रमा या प्रकल्पांतर्गत स्वतः जहाज बनवून त्यांनी एकट्याने ही सफर केली आहे.

२६ सप्टेंबर १९६७ साली जन्मलेले दिलीप दोंदे हे निवृत्त भारतीय नौदल अधिकारी आहेत. शिडाच्या जहाजातून त्यांनी ऑगस्ट २००९ ते मे २०१० या काळात एकट्याने जगपरिक्रमा केली. 'सागर परिक्रमा' या प्रकल्पांतर्गत त्यांनी हा प्रवास आखला आणि पूर्ण केला. आणि विशेष म्हणजे त्यांनी प्रवास केलेले जहाज हे त्यांनी स्वतः तयार केली आहे. हे जहाज बनवायला त्यांना ४ वर्ष लागली. श्री रत्नाकर दांडेकर यांनी त्यांना हे बनवण्यासाठी मदत केली. ऍडमिरल मनोहर प्रल्हाद आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली 'सागर परिक्रमा' हा प्रकल्प करायचे ठरले. त्यासाठी दिलीप दोंदे यांनी तयारी दाखवली. त्यावेळी त्यांचे वय ४३ होते. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारतामध्ये नाविक तयार करणे आणि जगभर प्रवास करणे हा होता.

त्यांनी प्रवास केलेल्या जहाजाचे नाव INSV Mhadei हे आहे. हे एक भारतीय नौदल सिलिंग जहाज होते. जे गोव्यात बांधले होते. रत्नाकर दांडेकर आणि दोंदे यांनी ते जहाज बनवले. रत्नाकर दांडेकर हे गोव्यातील डिव्हार बेटातील एक बोट बांधणारे आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांनी आजपर्यंत कधीही असे जहाज बनवले नव्हते. वास्तविक पाहता कोणत्याही भारतीय कंपनीने तोपर्यंत महासागरात प्रवास करणारे असे जहाज बांधले नव्हते. म्हणून या जहाजाचे महत्व खूप आहे. फेब्रुवारी २००९ ला भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले. गोव्यातील मांडोवी नदीचे मूळ नाव म्हादेई नदीवरून त्याचे नाव ठेवले आहे.

या प्रवासात त्यांना अनेक अडचणी आल्या. कधी वातावरणात बिघाड झाल्यामुळे, बोटीत बिघाड झाल्यामुळे काही निर्णय पटकन घेऊन त्याची अंमलबजावणी करावी लागली. पण मनात दृढ निश्चय होता. हा प्रवास सुरु करण्यापूर्वी ही त्यांना काहीजण हसले, एकट्याने प्रवास करताय तर १५ दिवसांत परत याल किंवा कुठेतरी हरवून जाल असे हिणवले. पण कॅप्टन दोंदे यांनी दुर्लक्ष केले. एकूण २७३ दिवसांचा प्रवास त्यांनी मुंबईतून सुरू करून मुबंईत संपवला. नऊ महिन्यांच्या प्रदक्षिणादरम्यान ते चार बंदरांवर थांबले. त्यांनी पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास केला. भारतीय, पॅसिफिक, दक्षिणेकडील आणि अटलांटिक महासागरामध्ये २३,००० नॉटिकल मैलांचे अंतर पार केले. ऑस्ट्रेलियामधील केप लिऊविन ,दक्षिण अमेरिकेतील केप हॉर्न आणि आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप याला वळसा घातला . हा प्रवास १९ ऑगस्ट २००९ रोजी सुरू करून १९ मे २०१० रोजी पूर्ण झाला.

ही जगपरिक्रमा यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर २२ मे २०१० रोजी तत्कालीन उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. दिलीप दोंदे यांचे कौशल्य, दृढनिश्चय आणि धैर्य याचे कौतुक केले.

दिलीप दोंदे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारतातील मानाचा शौर्य चक्र पुरस्कार त्यांना मिळाला आहे. तसेच तेनसिंग नॉर्गे नॅशनल अ‍ॅडव्हेंचर अवॉर्ड, मॅकग्रेगर मेडल आणि मेरीटाईम ऍचिव्हमेंट अवॉर्ड हेही पुरस्कार मिळाले आहेत. दिलीप दोंदे यांनी त्यांच्या रोमांचक प्रवासाचे वर्णन first indian या पुस्तकात केले आहे. ऍमेझॉन व फ्लिपमार्ट वर ते उपलब्ध आहे.

सध्या दोंदे हे 'अंतरा' या त्यांच्या खासगी जहाजातून सागरपर्यटन आवडणाऱ्या पर्यटकांना सफर घडवून आणतात. दिलीप दोंदे आणि सुचेता जाधव यांनी २०१९ अंतरा या जहाजाची सुरूवात केली. सुचेता जाधव या त्यांच्या जोडीदार आहेत. त्यांनाही सागर पर्यटनाचे वेड आहे. एक वेगळा अनुभव घेण्यासाठी अनेकजण मुंबईत हा आनंद लुटतात.

समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन भारताची शान वाढवणाऱ्या कॅप्टन दिलीप दोंदे यांना एक सॅल्युट तर झालाच पाहिजे.

 

लेखिका: शीतल दरंदळे

टॅग्स:

Bobhatamarathi

संबंधित लेख