एकीकडे मुंबईचा शेअरबाजार काही मोजक्याच मेंबर ब्रोकरच्या हातात होता, तर सिक्युरिटी मार्केट हे काही खास लोकांसाठीचं राखीव जग होतं. अगदी तुलना करायची झालीच तर तेव्हाचं सिक्युरिटी मार्केट हॅरी पॉटरच्या होगवार्ट सारखं होतं. त्या जगातल्या नजरेत बाकीचं जग हे 'मगल्स'नी भरलेलं होतं. बँकांच्या 'ट्रेझरी' डिपार्टमेंटच्या कर्मचार्यांचा अपवाद वगळता हा बाजार कशाचा आहे, कसा चालतो याची कोणालाही माहिती नव्हती. त्यामुळे जी-सेक(G-Sec) ट्रेझरी बील(T-bills) डेटेड जी-सेक (Dated G-Secs) असे शब्द परक्या ग्रहावरच्या भाषेतले असावेत इतके परके होते.
एका घट्ट आणि बंद वर्तुळातील ही दुनिया होती असं म्हटलं तरी चालेल आणि ही दुनिया तशीच रहावी असं वाटणारी माणसं पण त्यात होती. तेव्हा आणि आजही त्या बाजारावर रिझर्व्ह बँकेचा लगाम होता. खरं म्हणजे त्यांचा अंकुश होता असं म्हणायला हवं, पण तो शास्त्रापुरताच होता. या बाजारातले व्यवहार 'इंटर-बँक' म्हणजे बँकांचे आपापसांतले व्यवहार होते. तरीपण त्यांना ब्रोकरची गरज होतीच. वर्षानुवर्षं ठरावीक ब्रोकर मंडळींनी या बाजारात पाय घट्ट रोवले होते. बाहेरच्या एखाद्याने या बाजारात दलाली करायची म्हटलं तर शक्यच नव्हतं. असं काय विकलं घेतलं जायचं या बाजारात ते आता समजून घेऊ या.







