तुमच्यापैकी किती जण मोबाईल वापरतात? जवळपास सगळेच. अनेक जणांसाठी मोबाईल एक व्यसन बनले आहे. पूर्वीच्या चित्रपटात काही डॉयलॉग कायम ऐकायला यायचे. नायक त्याच्या नायिकेला म्हणायचा... “मै तेरे बगैर नही जी सकता...” किंवा... “तुझे मुझसे कोई भी अलग नही कर सकता...” पण आज हेच डॉयलॉग माणूस त्याच्या मोबाईलला म्हणू लागतो. आणि समजा तुमचा इतका प्रिय मोबाईल बंद पडला किंवा कायमचा खराब झाला तर? किंवा तुमच्यासाठी तो डोकेदुखी ठरला तर? आणि हे शक्य आहे... मोबाईल हॅकिंग ही गोष्ट आजकाल खूप सर्वसामान्य बाब झाली आहे. या गोष्टी आजकाल अगदी नुकतेच शालेय शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थीही करू शकतात. त्यांच्यासाठी गंमत असते पण तुमच्यासाठी डोकेदुखी, त्यांच्यासाठी नवीन शिक्षण असते तर तुमच्यासाठी न आवडणारा अनुभव. बरे काही जण त्याचा तुमच्याविरुद्धचे शस्त्र म्हणूनही वापर करू शकतात.
जी गोष्ट मोबाईलची, काहीशी तशीच गोष्ट इमेलची. आजकाल विद्यार्थी असो वा व्यावसायिक... ईमेलचा वापर करतातच. अनेक गोष्टी या इमेलमुळे खूप सोप्या झाल्या आहेत. आणि समजा तेच इमेल हॅक झाले तर? अनेकदा तर त्यात तुमची खूप महत्त्वपूर्ण आणि खाजगी माहिती असू शकते. आणि तीच माहिती नको त्या व्यक्तीला समजली तर??? तुम्हाला आलेला इमेल तुमच्या ब्लॅकमेलचे साधन बनला तर?












