पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर अंफान नावाच्या वादळाने नुकताच धुमाकूळ घातलेला असताना महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर सुद्धा निसर्ग नावाचे वादळ घोंघावत आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व -पूर्व मध्य अरबी समुद्रात पुढच्या 48 तासात एक कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याच्या पुढच्या 48 तासात तो अजून तीव्र होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागानुसार ज्यावेळी हे चक्रीवादळ जमिनीला टक्कर देईल त्यावेळी हवेचा वेग ताशी 120 किमी असेल. याचा धोका ओळखून महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर NDRF ची टीम तैनात करण्यात आली आहे. महाराष्ट्रात NDRF च्या टीमपैकी तीन मुंबईत, दोन पालघर आणि ठाणे,सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड येथे एक- एक टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
हवामान विभागाने अजून नेमके हे चक्रीवादळ कुठल्या भागात येईल हे स्पष्ट केलेले नाही. पण स्कायमेटनुसार उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यावर टक्कर देईल. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार 1981 नंतर पहिल्यांदा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.





