रोज रोज टिव्हीवर झळकणारे आकडे- राज्यकर्त्यांचे निवेदन -कोरोनाचे आकडे बघून तुम्ही पण आमच्याइतकेच कंटाळले असाला म्हणून आज काहीतरी नवा विरंगुळा तुमच्यासमोर मांडतो आहे. तर वाचकहो, आजचा विषय आहे 'कोड लँग्वेजचा' म्हणजे गुप्त खाणाखुणांचा! रोजच्या बोलीतल्या भाषा जशा जन्माला आल्या तशाच अनेक सांकेतिक भाषाही जन्माला आल्या. सहजासहजी इतरांना समजणार नाही, फक्त मोजक्याच माणसांना समजेल अशी ही 'कोड लँग्वेज' गरजेपोटी जन्माला आली. जुन्या काळात युध्दादरम्यान संदेश पाठवायचा झाला तर अशा सांकेतिक भाषेतून पाठवला जायचा.
शिका संकेत भाषा: फ्लॅग सेमाफोर!! झेंड्यांच्या साहाय्याने संदेश पाठवण्याची २०० वर्षे जुनी पद्धत!!


('कोड लँग्वेज'ची यादी)
आजही वेगवेगळ्या रुपात आपण सांकेतिक भाषा वापरतच असतो. काही संकेत दृष्य असतात जसे-अडचणीत असलेले जहाज लाल रंगाचा धूर सोडून मदत मागते, रात्रीची वेळ असेल तर लाल आतषबाजी करते. काही संकेत ध्वनी रुपात असतात जसे - अँब्युलन्सचा-अग्नीशमन-पोलीस यांचे भोंगे हे ध्वनी संकेत आहेत. काही संकेत देहबोलीचे असतात - डोळे वटारून बघणे, डोळा मिचकावणे, मूठ वळून दाखवणे. काही वेळा बोलीभाषेतील ठरावीक शब्द वापरून आज्ञा दिल्या जातात. काही महिन्यांपूर्वी आम्ही 'ठगाची जबानी' प्रकाशित केली होती. या जबानीत 'हुक्का आणा आता' या वाक्याचा अर्थ 'हातात सापडलेल्या सावजाचा गळा घोटा'असा होता हे तुम्हाला आठवतच असेल.
पण हे सगळे संकेत आहेत. पूर्ण सांकेतिक भाषा नाहीत. सलग-अर्थपूर्ण संदेशवहनासाठी अनेक संकेतातून एक प्रणाली तयार करावी लागते. अशा अनेक प्रणाली आहेत त्यापैकी एक म्हणजे 'फ्लॅग सेमाफोर'!!

वेगवेगळे झेंडे वापरून संदेश प्रसारित केले जाणे म्हणजे 'फ्लॅग सेमाफोर'. सर्वसामान्यपणे नाविक दलात ही भाषा वापरली जाते. 'फ्लॅग सेमाफोर' ची प्रणाली १८ व्या शतकात होम रिग्ज पोफॅम नावाच्या एका नाविकदलातल्या अधिकार्याने तयार केली, ती नंतर १८०३ साली ब्रिटीश नौदलाने वापरायला सुरुवात केली. चार्ल्स पास्ली या अधिकार्याने त्यामध्ये काही सुधारणा केल्या. आता या पध्दतीनुसार संदेश कसे पाठवले जातात ते बघूया!
या सांकेतिक भाषेत ३० चिन्ह किंवा झेंडे वापरण्याच्या खुणा आहेत. त्यापैकी A-B-C-D-E-F-G-H-I आणि K यांचा उपयोग अक्षर आणि संख्या 1-2-3-4-5-6-7-8-9- 0 असा दोन्हीसाठी केला जातो. आता असे दुहेरी संकेत असल्यावर गोंधळ होऊ नये म्हणून मध्ये J चा वापर केला जातो.

आता एक मनोरंजक कथा ऐका 'पीस सिंबॉलची! १९५८ साली 'अणुयुध्द नको -जगात शांतता हवी' Campaign for Nuclear Disarmament चळवळ सुरु झाली. या चळवळीत अनेक लहान मुले सामील झाली होती. त्यांच्या हातातील झेंड्यांवर हा लोगो प्रथम वापरण्यात आला. जेराल्ड हॉल्टॉम या कलाकाराने Nuclear Disarmament या शब्दातील N आणि D ही दोन अक्षरे घेतली. त्या अक्षरांची फ्लॅग सेमाफोरमधील चित्रे एकत्र करून हे प्रतिकचिन्ह तयार केले. त्यानंतर हे चळवळीचे अधिकृत चिन्ह म्हणून स्वीकृत करण्यात आले.

हे सगळे वाचून झाले पण यातून विरंगुळा कसा शोधायचा ? ते पण काही प्रयोग आपण बघू या.
तुम्ही सध्या 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका बघताय का ? आता या मालिकेची नायिका लतिका नायकाला म्हणजे अभिमन्यूला धावण्याच्या स्पर्धेत भाग घे हे कसे सांगेल ? तुम्ही तुमचे नाव या सांकेतीक भाषेत जुळवून बघा. आम्ही आमचे नाव बोभाटा असे लिहू आणि तुम्ही 'लाइक' असे लिहू शकाल ! बघा हा सराव करता करता एक आठवडा सहज निघून जाईल. तोपर्यंत आम्ही आणखी काही संकेतभाषांवर नवा लेख लिहितो.

टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१
