आकाश सिन्हा हे IIT मधून BTech (कॉम्प्युटर इंजिनिअर) आहेत. २०१२ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी बंगलोरच्या बँकबझार डॉट कॉम या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी सुरू केली. त्यानंतर त्यांना २०१३ मध्ये अमेझॉनमध्ये नोकरी मिळाली. या दोन्ही नोकरीत त्यांना एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे कॅशफ्लो. डिजिटल पेमेंट सिस्टीमची नुकतीच सुरुवात झाली होती. बऱ्याच गोष्टी रोख पैसे देऊन होत असत. डिजिटल पेमेंट करायला लोक सहज तयार व्हायचे नाही. व्यवसायिकही व्यवहार करताना रोख पैसेच स्वीकारत. आकाश यांनी ग्राहकांना आणि व्यवसायिकांना डिजिटल पेमेंट करताना कोणत्या अडचणी येतात यावर अभ्यास केला. नव्या व्यावसायिकांना पैशाची गरज असताना काही मार्ग काढता येईल का याचा विचार केला. अमेझॉनमध्ये नोकरीला दोन एक वर्षेच झाली होती. मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी २०१५ मध्ये कॅशफ्री नावाची कंपनी स्थापन केली. त्या कंपनीची टॅगलाईन हीच तिची ओळख आहे - Solving payment challenges for India.
ग्लोबल पेआउट्सच्या सहाय्याने ही कंपनी आंतरराष्ट्रीय व्यवसायांना त्यांचे विक्रेते किंवा फ्रीलान्सर्सना थेट त्यांच्या स्थानिक भारतीय बँक खात्यात पैसे भरण्यास मदत करते. आकाश सिन्हा म्हणतात की, 'कॅशफ्रीच्या सुरुवातीच्या काळातच आम्ही ओळखले की, मोठ्या रकमेची आणि जास्त प्रमाणात करायची पेमेंट्स (देयके)आणि त्याचे वितरण हे डिजिटल पेमेंट्समध्ये, व्यवसायांसाठी एक अवघड आव्हान होते.'
त्यासाठी त्यांनी आघाडीच्या बँका आणि व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. सुट्टीच्या दिवसांमध्येही पेमेंट करता यावेत यासाठी ऑटोमेटेड कॅशफ्री डॅशबोर्डचा वापर करून ही समस्या सोडवली. गेल्या काही वर्षांमध्ये कॅशफ्री ला इतका चांगला प्रतिसाद मिळाला, की पहिल्या वर्षापासून चांगला नफा होऊ लागला. मार्च २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत कॅशफ्रीचा महसूल तिप्पट झाला. सुरुवातीला फक्त ४० कर्मचारी असलेली कंपनी आज १००च्या वर कर्मचाऱ्यांची झाली आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि बेंगलोर या चार शहरांमधून कॅशफ्रीचं काम चालतं. आता त्यांना आपल्या शाखा भारतभर पसरवायच्या आहेत.