सूचना : काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीचा योग्य अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न या लेखात केलेला आहे. केवळ सनसनाटी बातमी देणे हा 'बोभाटा'चा उद्देश कधीही नसतो. हे वाचूनच सोबतचा लेख पुढे वाचावा.
चारच दिवसांपूर्वी '२१ कोटी रुपयांचे ७ किलो युरेनियम बाळगणार्या आणि ते विकण्याचा प्रयत्न करणार्या दोन तरुणांना अटक' या बातमीने एक भितीची नवी लाट निर्माण केली आहे. या बातमीत '२१ कोटींचा' वरवर होणारा उल्लेख ज्यांना खटकला नसेल त्यांना खर्या मानसिक ताणाचा सामना करावा लागणार नाही. पण '७ किलो युरेनियम' हे शब्द या बातमीत जास्त महत्वाचे आहेत. ते शब्द ज्यांना कळले असतील त्यांच्या जीवाला नक्कीच मानसिक घोर लागला असेल. आता बातमीत '२१ कोटी' रुपयांचा उल्लेख करणे तद्दन मूर्खपणाचे लक्षण आहे, कारण युरेनियम म्हणजे सोनं नाही, ते बाजारात जाऊन विकता येत नाही. जे युरेनियम विकत घ्यायला तयार झाले असतील ते नक्कीच सज्जन नाहीत. जे युरेनियमचे प्रत्यक्ष वापरकर्ते आहेत, म्हणजे 'एंड युजर' आहेत त्यांनाच या किमतीशी देणं घेणं आहे. अर्थातच हे 'एंड युजर' घातपाती कारवायांशी जोडलेले अतिरेकी असतील यात शंका नाही.











