आपल्या शेजारील चीनला बराच मोठा सांस्कृतिक वारसा आहे. बौद्ध परंपरेचा प्रभाव चीनवरही आढळतो. जगातील सर्वात मोठी बुद्ध मूर्तीही चीनमध्येच आहे. अलीकडेच अगदी चार-आठ दिवसांपूर्वी चीनच्या शॉंग्किंग मध्ये एक जुनी बुद्धमूर्ती आढळून आली आहे. यात नवल तसं काही नाही, कारण अशा जुन्यापुराण्या मुर्त्या अधूनमधून सापडतच असतात. या मूर्तीचं कौतुक यासाठी की शॉंग्किंग मधील एका उंच ठिकाणी बांधलेल्या दोन अपार्टमेंट्सच्या पायाशी ही बुद्धमूर्ती आढळून आलेली आहे. परंतु ३० फुट उंचीच्या या बुद्धमूर्तीला शीरच नाही. या बुद्ध मूर्तीचा फक्त खांद्यापर्यंतचा भाग दिसतो. त्याच्या खांद्याच्या वरच्या बाजूलाच या दोन्ही अपार्टमेंटचे बांधकाम केलेले दिसेल.
ही बुद्ध मूर्ती सुमारे १००० वर्षे जुनी असल्याचा दावा केला जात आहे. मात्र हे अपार्टमेंट बांधले जात असतानाच इथे बुद्ध मूर्ती असल्याचे कुणाच्या ध्यानात आले नसेल का? हा प्रश्न मात्र अनेकांना अस्वस्थ करत आहे.








