टी-शर्ट पासून ते शहरातल्या भिंतींवर हा चेहरा दिसतो. हा आहे तरी कोण ? खरं तर एवढ्या वर्षात या व्यक्तीचं नाव जाऊन फक्त चेहराच उरला आहे. तरी या चेहऱ्याची ओळख करून देतो. या चेहऱ्याचं नाव आहे ‘अर्नेस्टो चे गेव्हारा’. क्रांतिकारक, सेनानी, नेता, शिक्षणाने आणि व्यवसायाने एक फिजिशियन. दक्षिण अमेरिकेत ६० च्या दशकातल्या धगधगत्या वातावरणात स्वस्त बसून आपलं काम करत राहणं शक्यच नव्हतं. एका तरुण तडफदार व्यक्तीला तर नाहीच नाही. त्यामुळे आपलं शिक्षण व्यवसाय सोडून हा तरुण येऊन पडला क्रांतीत. दक्षिण अमेरिकेतल्या त्या क्रांतिकारी युगाचं प्रतिक म्हणजे चे गेव्हारा.
पण चे गेव्हारा हा व्यक्ती सामान्य माणसाला फारसा माहिती नाही. तरी तो क्रांतीत, मोर्चात आणि तरुणांच्या कपड्यांवर दिसतो. ही किमया कशी साधली गेली ? या मागचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही या लेखातून करणार आहोत.



















