देशाच्या इतिहासात घडून गेलेल्या काही घटना विसरणे अशक्य असते मंडळी. त्यातल्या काही दुर्दैवी घटनांच्या जखमा नेहमी ताज्या असतात. कितीही काळ लोटला तरीसुद्धा त्या जखमा बऱ्या होत नाहीत. बरोब्बर शंभर वर्षांपूर्वी एक अशीच क्रूर, हिंसक घटना अनेक निष्पाप भारतीयांसोबत घडली होती. जालियनवाला बाग हत्याकांड!
इंग्रज अधिकारी जनरल डायर याने सभेसाठी जमलेल्या लोकांवर बेछूट गोळीबार करण्याचा आदेश दिला आणि महिला, बालकांसह अनेकांची सरेआम कत्तल झाली. गोळीबार आणि चेंगराचेंगरीमध्ये कित्येक अभागी जीव हकनाक मारले गेले. आज हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी आलेली बातमी! बातमी अशी आहे की, या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या शंभर वर्षानंतर पाकिस्तानचे माहिती तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये दोन उल्लेखनीय गोष्टींचा समावेश आहे. एक, शंभर वर्षांपूर्वी घडलेल्या हत्याकांडाबाबत ब्रिटिश सरकारने भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांची माफी मागितली पाहिजे. आणि दोन, ब्रिटिशांनी कोह-इ-नूर (कोहिनूर) हिरा पाकिस्तानकडे सुपूर्द केला पाहिजे.









