सर्वसाधारण बाजारपेठेत व्यापार चालत असतो तेव्हा एकाच प्रकारचे उत्पादन चार वेगवेगळ्या कंपन्या विकत असतात. त्यामुळे बाजारात वर्चस्वासाठी स्पर्धा निर्माण होते. वेगवेगळ्या स्कीम ग्राहकांना दिल्या जातात. लक्ष वेधून घेणार्या जाहिराती तयार केल्या जातात. त्या वेगवेगळ्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात. एक ना दोन, अनेक क्लुप्त्या वापरून ग्राहक आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न केले जातात. आपल्या रोजच्या ओळखीचे उत्पादनापैकी एक म्हणजे कपडे धुण्याची पावडर-युनीलिव्हर, प्रॉक्टर अँड गँबल, निरमा आणि असंख्य इतर छोट्या कंपन्या बनवत असतात. या सगळ्याच कंपन्या बाजारातील विक्रीचा जास्तीतजास्त हिस्सा मिळवण्यासाठी धडपडत असतात. थोडक्यात सगळ्या कंपन्या एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. हे आपल्या परिचयाचे चित्र आहे.
आता बाजारपेठेतल्या एक वेगळ्याच प्रकारची 'मैत्री 'बघू या ! या 'मैत्री'च्या अलिखित करारात एकाच प्रकारचे उत्पादन बनवणार्या अनेक कंपन्या सहभागी होतात. सगळ्यांची उत्पादने एकसारखी असली तरी 'दुश्मनी' बाजूला ठेवून ग्राहक आणि सरकार या दोन्ही पक्षांना कसे लुबाडता येईल याच्या योजना बनवतात. बाजाराच्या भाषेत अशा 'मैत्री 'ला कार्टेल म्हणतात.












