कर्फ्यूमुळे आपण माणूस झालो! हे वाक्य वाचल्यावर बोभाटाच्या लेखकांच्या डोक्यावर कर्फ्यूमुळे परिणाम झाला आहे का काय? असं तुमच्या मनात आलाही असेल. पण सांगायचा मुद्दा असा आहे की एकेकाळी पृथ्वीवर माकडांसारखी वावरणारी माणसांची जमात या कर्फ्यूमुळेच 'माणसात' आली! आता ते कसं काय ते नेमकं समजून घेऊ या!
पुरातन काळी आदिमानव इतर जनावरांसारखंच आपलं आयुष्य जगत होता. जीवनशैली वानरांचीच होती म्हणा ना. फरक इतकाच होता आदिमानव शिकार करून प्राण्यांचे मांसही भक्षण करत असे. या जीवनशैलीत आधी अन्न शोधत फिरायचे, नंतर ते दिवसभर ते कच्चे अन्न चघळत रहायचे आणि उरलेल्या तासांमध्ये ते पचवायचे काम त्याची आतडी करायची. आता गंमत बघा, वनस्पतीजन्य अन्न हे वनस्पतींनी साठा केलेले असल्याने पचायला हलके जायचे. पण पुरेशी उर्जा मिळण्यासाठी ते मोठ्या प्रमाणात खावे लागायचे. कच्च्या मांसाने पोट भरायचे, पण ते पचवण्यासाठी जास्त उर्जा लागायची. शरीराने मिळवलेली जास्तीतजास्त उर्जा अन्न पचवण्याच्या कामात वापरली जायची. म्हणून त्या काळात आतड्यांचा आकार आणि लांबी जास्त होती. परिणामी मेंदूची वाढ फारशी व्हायची नाही.









