डॉलरची किंमत दिवसेंदिवस वाढत जाते आहे, सोन्याच्या भावाने ४५ हजारांचा टप्पा पार केला आहे, तर दुसरीकडे कोविडचा विळखा दिवसेंदिवस घट्ट आवळत जातो आहे. येणार्या आर्थिक चणचणीची ही लक्षणे डोळ्यासमोर दिसत असतानाही माणसांची सोनं विकत घेण्याची भूक काही मरत नाही असं चित्र सध्या दिसत आहे. जे खाता येत नाही, जे औषधात कामाचे नाही, जे सुरक्षित ठेवण्यासाठी खर्च करावा लागतो, ज्यावर व्याजही मिळत नाही अशी सोन्यातली गुंतवणूक माणसं का करतात हा प्रश्न मनाला विचारला, तर एकच उत्तर मिळते,"अगदी काळ्या मध्यरात्रीसुध्दा विकून पैसे उभे राहतात, म्हणून सोनं घ्यायचं!" अशा सोन्याचे भाव कोण आणि कसे ठरवतं हा प्रश्न मात्र कोणीही विचारताना दिसत नाही. जे विचारतात त्यांना उत्तर मिळत नाही. तर अशा अवघड प्रश्नांची उत्तरं समजून घेण्यासाठी आजचा बोभाटाचा लेख वाचावाच लागेल.
सर्वप्रथम एक धक्कादायक बाब तुमच्या नजरेस आणून द्यायची आहे. ती म्हणजे सोन्याचा भाव जगातले कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्यासाठी कोणतेही कायदेशीर कलम नाही. सोन्याचा भाव ठरवणं केवळ बाजाराच्या हातात आहे. ज्या-ज्या सरकारने सोन्याच्या भावावर स्वत:ची सत्ता चालवण्याचा प्रयत्न केला, त्यांचे हात भाजले आहेत असा इतिहास आहे. चला तर मग, मूळ विषयाला हात घालू या! कोण ठरवतं सोन्याचा भाव?











