DSLR वापरताना या 8 काळज्या घेतल्याच पाहिजेत.. तुम्ही यातलं काय काय करता??

लिस्टिकल
DSLR वापरताना या 8 काळज्या घेतल्याच पाहिजेत.. तुम्ही यातलं काय काय करता??

अनेक लोकांना DSLR कॅमेरा मधून फोटो कसा काढायचा हे माहीत असते पण कॅमेऱ्याची काळजी कशी घ्यायची हे माहीत नसते. DSLR कॅमेरा महाग असतो पण थोडा जरी निष्काळजीपणा दाखवला तर तो खराब होऊ शकतो. तुम्ही DSLR कॅमेरा घेतला आहे का? किंवा घेण्याच्या विचारात आहात का? मग या महागड्या कॅमेऱ्याची काळजी घेण्याच्या काही युक्ती तुम्हाला माहीत असायलाच हव्यात.

1. कॅमेरा बॅग नेहमी वापरायची सवय ठेवा

1. कॅमेरा बॅग नेहमी वापरायची सवय ठेवा

DSLR कॅमेरे अतिशय नाजूक असतात. ट्रीपला जाताना, प्रवासात हे कॅमेरे जागा मिळेल तिथे सुटकेस, बॅग मध्ये कोंबणे चुकीचे आहे. काहीजण तर मोबाईल सारखा हा कॅमेरा खांद्यावर अडकवून फिरत असतात. या कॅमेऱ्याची रचना अशी असते की सहज स्क्रॅच उमटू शकतात अथवा लेन्सवर धूळ जमा होऊ शकते. तर कॅमेरा सोबत मिळालेली बॅग वापरण्याची सवय अंगी बाणवल्यास हे कॅमेरे दीर्घकाळ टिकू शकतात. ही बॅग फक्त धूळ आणि चऱ्यांपासून संरक्षण करते असे नाही तर ऊन पाऊस आणि वातावरणात होणाऱ्या बदलांपासूनही कॅमेऱ्याचा बचाव करते. बाजारात विविधरंगी आणि अनेक आकारांच्या कॅमेरा बॅग उपलब्ध आहेत. हजारो रुपयांच्या DSLR साठी आपण थोडा खर्च नक्कीच करू शकतो ना?
 

2. एलसीडी स्क्रीन आणि लेन्सची काळजी घ्या -

2. एलसीडी स्क्रीन आणि लेन्सची काळजी घ्या -

हा DSLR चा महत्वाचा भाग आहे. एलसीडी स्क्रीन आणि लेन्स साफ करण्यासाठी विशेष उपकरणांची गरज असते. साधा फडका अजिबात वापरू नका. आणि बाजारात मिळणारे स्वस्त हलक्या क्वालिटीचे ग्लास क्लिनर तर बिलकुल नको! हे क्लिनर लेन्स च्या अँटी ग्लेयर कोटींगला खराब करतात. त्यापेक्षा चांगल्या कॅमेरा शॉप मधून क्लिनिंग किट घ्या ज्यात लिक्विड सोल्युशन, मायक्रोफायबर कपडा आणि ब्रश असतात जे खास स्क्रीन आणि लेन्स साफ करण्यासाठी बनवलेले असतात. या वस्तूंनी तुम्ही कॅमेरा सेन्सर सुद्धा साफ करू शकता आणि त्यावर जमलेली धूळ काढू शकता.

3. कॅमेरा आणि बॅटरी वेगवेगळी ठेवा -

3. कॅमेरा आणि बॅटरी वेगवेगळी ठेवा -

जर तुम्ही कॅमेराचा वापर करत नसाल तर बॅटरी काढून वेगळ्या ठिकाणी ठेवणे हेच उत्तम राहील. ऍसिड लिक होणे ही बॅटरीची समस्या असते. आता नवीन आलेल्या बॅटरी लिथियमच्या असतात पण त्या ही कॅमेऱ्यामध्ये जास्त काळ ठेवणे चांगले नाही. या बॅटरीना दमट वातावरणात गंज चढतो आणि त्याचा सरळ परिणाम DSLR कॅमेरा वर होतो. जर तुम्हाला गंज आढळला आणि तो कमी प्रमाणात असेल तर तुम्ही पेन्सिल खोडरबरने काळजीपूर्वक घासून तो काढू शकता. जर मोठ्या प्रमाणात गंज चढला असेल तर बॅटरी तात्काळ फेकून नवीन बॅटरी घेणेच योग्य असेल. 

4. वापर झाल्यानंतर कॅमेरा नेहमी बंद करा -

4. वापर झाल्यानंतर कॅमेरा नेहमी बंद करा -

जर तुम्ही फोटो काढण्याव्यतिरिक्त कॅमेरा सोबत कुठलेही काम करत असाल, जसे की, मेमरी कार्ड बदलणे, केबल काढणे अथवा लावणे, साफ सफाई करणे इत्यादी. तर त्या वेळी कॅमेरा स्विच ऑफ असणे गरजेचे असते. कॅमेरा चालू स्थितीत असताना मेमरी कार्ड काढल्यास ते कायमस्वरूपी खराब होऊन त्यातला डेटा पुसला जाऊ शकतो. लेन्स बदलतानाही कॅमेरा चालू असल्यास सेन्सर वर धूळ बसू शकते आणि त्याचा परिणाम फोटो क्वालिटीवर होतो. कॅमेरा बंद ठेवला तर बॅटरीची सुद्धा बचत होते. तेव्हा काम संपल्यानंतर कॅमेरा आवर्जून बंद करण्याची सवय लावून घ्या.

5. ब्रँड बदल करू नका -

5. ब्रँड बदल करू नका -

सामान्यतः आपण बॅटरी संपल्यानंतर किंवा खराब झाल्यानंतर जी मिळेल ती बॅटरी खरेदी करतो आणि कॅमेऱ्यात टाकतो. तसे करू नका. कॅमेरा कंपनीने कुठली बॅटरी वापरायची याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या असतात त्याचे कटाक्षाने पालन करा. बॅटरी अचानक खराब झाल्यास बॅटरी कंपनीला संपर्क साधा. तुम्हाला बॅटरी बदलून नवीन मिळू शकते. 

6. वातावरणापासून काळजी घ्या -

6. वातावरणापासून काळजी घ्या -

DSLR कॅमेऱ्याची बॉडी ही प्लॅस्टिकपासून बनलेली असते. तसेच याचे आतील पार्ट, बटन, सर्किट बोर्ड अतिशय नाजूक असतात. थंडीत किंवा पावसात कॅमेरा वापरला तर हे खराब होऊ शकतात. एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी फोटो काढत असाल तर फक्त लेन्स उघडी ठेवून बाकी बॉडी कपड्याने गुंडाळा. पावसाळी वातावरणात फोटो काढत असाल तर प्लास्टिक पिशवीने बॉडी झाका. कॅमेरा थोडा जरी ओला झाला तर त्वरित कोरडा करा. त्यासाठी सोबत मऊ कपडा अवश्य ठेवा. 

7. मेमरी कार्ड सांभाळा -

7. मेमरी कार्ड सांभाळा -

कॅमेऱ्याचा महत्वाचा भाग म्हणजे मेमरी कार्ड. याच मेमरी कार्ड मध्ये फोटो सेव्ह होत असल्याने कार्ड ची काळजी घेणे गरजेचे असते. पण कित्येकदा असे आढळून येते की, याचा वापर धसमुसळेपणाने केला जातो. तर मेमरी कार्ड जपून वापरा. कार्ड बदलताना उघड्यावर बदलू नका. धूळ नसेल अश्या ठिकाणीच कार्ड बदला. मेमरी कार्डवर उष्ण वातावरणाचा परिणाम होतो म्हणून कार्डला गरम ठिकाणी अथवा सूर्यप्रकाशात ठेवू नका. ज्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र आहे, उदा: लोहचुंबक, स्पीकर्स, टिव्ही अश्या ठिकाणी मेमरी कार्ड ठेवू नका. 

8. फिल्टरचा वापर करा -

8. फिल्टरचा वापर करा -

DSLR कॅमेऱ्याच्या लेन्सवर चटकन स्क्रॅच पडू शकतात. चुकून कॅमेरा हातातून खाली पडला तर सर्वात पहिल्यांदा लेन्स फुटू शकते. या लेन्स अतिशय महाग असल्याने याची काळजी घेणे गरजेचे असते. लेन्सवर फिल्टर लावण्याची सवय आपले बरेच नुकसान कमी करू शकते. कॅमेरा पडला तर हे फिल्टर फुटतात पण लेन्सला नुकसान पोहोचू देत नाहीत. तसेच पोलराईज फिल्टर, कलर फिल्टर, डेन्सीटी फिल्टर मुळे फोटोंची क्वालिटी सुद्धा चांगली येते.

 

या युक्त्यांचा वापर केल्यास आपला महाग DSLR कॅमेरा दीर्घकाळ आपली साथ देऊ शकतो.

 

आणखी वाचा : 

तुम्हाला माहिती आहे की पहिला फोटो १८२६ मध्ये काढला गेला होता? जाणून घ्या आणखी काही शोधांबद्दल...

टॅग्स:

marathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख