$TSLAQ ग्रुपचे मेंबर वेगवेगळ्या ट्विटर अकाउंटवरून सतत टेस्ला कंपनीला धारेवर धरत असतात. फक्त टेस्ला विरोधात सोशल मिडीयावर काही ना काही लिहिण्यासाठी म्हणून यातील काही लोकांनी फेक अकाउंट काढले आहे. होथीनी देखील @skabooshka या टोपण नावाने ट्वीट केले आहे. २०१८ मध्ये होथी आणि त्याच्या भावाचे हे फेक अकाउंट अशाच आणखी एका फेक अकाउंटने उघडे पाडले होते. होथीचा भाऊ टेस्लाची स्पर्धक कंपनी असलेल्या फोक्सव्हॅगनमध्ये कर्मचारी आहे. तो सतत टेस्ला विरोधात काही ना काही लिहित असतो.
इलॉन मस्क याने त्याच्याबद्दल फोक्सव्हॅगनमध्ये तक्रारही केली होती. त्यानंतर इलॉन मस्क आणि होथी यांच्यात असेच सोशल मिडीयावर भांडण रंगले होते. होथीने आपल्या ट्वीटर अकाउंटवर आपली ओळख देताना, स्वतःला एक संशोधक/परीक्षक म्हटले आहे. सध्या तो कार्पोरेट कंपन्यांतील घोटाळे उघड करण्याचे काम करत असल्याचे त्याने यात लिहिले आहे. तो म्हणतो, “मी कार्पोरेट कंपन्यातील घोटाळे उघडकीस आणणारा एक रिपोर्टर असून सध्या फक्त टेस्ला कंपनीवर मी लक्ष केंद्रित केले आहे. जे कोणी प्रवासी, पर्यटक असतील, पत्रकार, इत्यादी असतील त्यांनी याविषयावर बोलण्यासाठी मला थेट मेसेज करावा.”
२०१९ मध्ये इलॉन मस्कने फोक्सव्हॅगनच्या ट्वीटर अकाउंट वर होथीच्या भावाबद्दल तक्रार केली होती. त्याच्या या ट्वीटमुळेही तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मस्कच्या या ट्विटला उत्तर देताना होथी म्हणाला होता, “एक दिवस टेस्ला संपलेली असेल. ही माझी प्रतिज्ञा आहे. आणि इलॉन मस्क तुरुंगाची हवा खात असेल.” हे ट्विट त्याने २० एप्रिल २०१९ मध्ये केले होते.
होथीने इलॉन मस्क विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या मते टेस्लाचा सीइओ इलॉन मस्कने त्याला दहशतवादी संबोधले होते आणि त्याच्यावर टेस्लाच्या कर्मचाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही लावण्यात आला होता. जो अर्थातच, खोटा होता. इलॉन मस्क माझ्याविरोधात अपमानजनक भाषेत सोशल मीडियातून पोस्ट करत आहेत, असेही त्याने या आरोपपत्रात म्हटले आहे.