इंडिगोच्या कर्मचाऱ्याने कुत्र्याला शोधण्यासाठी व्हिलचेअरवरून मुंबईत पालथी घातली!!

लिस्टिकल
 इंडिगोच्या कर्मचाऱ्याने कुत्र्याला शोधण्यासाठी व्हिलचेअरवरून मुंबईत पालथी घातली!!

तुम्ही कुत्रा आणि माणसाच्या मैत्रीचे किस्से पूर्वापार ऐकले असतील. कुत्रा हा प्राणी माणसाचा सर्वात जवळचा मित्र. अतिशय प्रामाणिक आणि लळा लावणारा हा प्राणी खूप जणांना आवडतो. एकवेळ माणूस माणसाला दगा देईल पण कुत्रा कधीच साथ सोडत नाही. माणूस आणि कुत्राच्या मैत्रीला उंचीवर नेणारा असा एक किस्सा नुकताच मुंबईत घडला आहे. हरवलेल्या कुत्र्याला शोधण्यासाठी एक अपंग माणूस व्हिलचेअर वर गल्लीबोळातून फिरला आणि त्याने त्याचा शोध घेतला.

जोसेफ रॉड्रिग्ज हे ३६ वर्षीय अपंग कर्मचारी असून ते व्हिलचेअर वापरतात. ते रोज विमानतळावर काम करत असतानाच विरंगुळा म्हणून ते 'व्हाईटी' नावाच्या कुत्र्याला खेळवत असत. 'व्हाईटी' सोबतची त्यांची मैत्री सर्वाना माहीत होती. रोज जणू त्या दोघांच्या गप्पा चालत असत. जोसेफ यांची शिफ्ट बदलली तरी ते इतर कर्मचारी मित्रांना व्हाईटीवर लक्ष ठेवायला सांगत असे. पण गेल्या आठवड्यात अचानक विमानतळा वरून व्हाईटी हरवला आणि जोसेफ बैचेन झाले. त्याला शोधायला ते व्हिलचेअरवर सगळीकडे फिरले.

त्यांनी आधी विमानतळावरच आसपासच्या लोकांना विचारण्यास सुरुवात केली. पण कोणीही 'व्हाईटी'ला पाहिले नव्हते. तेवढ्यात व्हाईटीचा मित्र ब्राउनी जोसेफ यांच्या जवळ आला. ब्राऊनी जणू त्यांना सांगत होता की व्हाईटीला इकडे शोधा. त्याच्या हालचालीवरून तोही काळजीत वाटला. मग जोसेफने व्हाईटीला संपूर्ण मुंबईत शोधायचे ठरवले. त्यांनी बऱ्याच प्राणी कार्यकर्त्यांकडे हरवलेल्या कुत्र्याचे फोटो आणि मेसेज पाठवले. सोशल मिडीयावर पोस्टही केली. ते पाहून काही प्राणी मित्रांनी तसेच मुंबईचे पोलिस एसीपी सुधीर कुडाळकर आणि त्यांच्या पथकाने मला व्हाईटीचा शोध कसा घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केले. 

जोसेफ यांनी गल्ली बोळात जाऊन शोध सुरू केला. वांद्रे आणि मालाड इथे असलेल्या कुत्र्यांसाठीच्या केंद्रात जोसेफ गेले. तिथे पालिका भटकी कुत्री आणून ठेवत असे. शेवटी मालाडला एका भिंतीच्या मागे जोसेफना व्हाईटी दिसला. व्हाईटीने जोसेफला पाहिल्यावर आनंदाने उडी मारली. अखेर दोघांची भेट झाली. जोसेफ यांना खूप आनंद झाला. त्यांनी सर्व प्राणिमात्रांचे आणि त्यांना मदत केलेल्याचे आभार मानले.

ऍनिमल वेलफेयर बोर्ड ऑफ इंडियाचे प्राणी अधिकारी मितेश जैन यांनी हा किस्सा ऐकून सांगितले की, 'जोसेफचे कौतुक करावेच लागेल, आपला कुत्रा शोधण्यासाठी तो व्हिलचेयरवर फिरला. कुत्र्यांचे लसीकरण केले आणि त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले तर कुत्रे कधीही त्रासदायक नसतात. त्यांना फक्त खायला देण्याऐवजी त्यांना प्रेमाचीही गरज असते.'

जोसेफ आणि व्हाईटीच्या मैत्रीचा किस्सा सध्या नेटकऱ्यांना  भावुक करतोय. 

 

लेखिका: शीतल दरंदळे

टॅग्स:

bobhata marathiBobhatamarathi

संबंधित लेख