भारताचं नंदनवन अशी ख्याती असलेल्या केरळला बोभाटाचे हितचिंतक श्री. कुमार मोरे आणि अपर्णा मोरे यांनी भेट दिली. त्यांना दिसलेला-गवसलेला केरळ आम्ही त्यांच्याच शब्दांत इथे देत आहोत. श्री. कुमार मोरेंना तुम्ही थेट ओळखत नसाल, पण त्यांनी काम केलेल्या एका कलाकृतीशी आपला चांगलाच परिचय आहे. ही कलाकृती म्हणजे अमूलची प्रसिद्ध अमूल गर्ल. अशा या प्रतिभावंत कलाकाराची मदत बोभाटालाही मिळाली. बोभाटाच्या ठगाची जबानी सिरीजसाठीही कुमार मोरे यांनी आपल्या खास शैलीत स्केचेस काढून दिले होते. त्याबद्दल बोभाटा टीम त्यांची आभारी आहे.
कन्नूरला पोहचता पोहचता संध्याकाळ झाली होती. आम्ही St. Angelo’s किल्ला बघितला. हा किल्ला अगदी समुद्रकिनारी आहे. तिथून सूर्यास्त खूपच छान दिसला. दुसर्या दिवशी लवकरच आम्ही हॉटेलमधून चेक आऊट केले आणि मुटप्पन (Muthappan) गावाकडे निघालो. तिथल्या पराशिनी कडऊ(Parassini Kadavu) मंदिरात गेलो. तिथे समजलं थय्यम नृत्य दुपारी २:३० वाजता आहे. आता काय कारायचं? मग आम्ही २०-२५ कि. मी. प्रवास करून कन्नूरला ‘Kerala Folklore Academy’ बघायला परत गेलो.












