महाराष्ट्रातल्या तमाम गड-किल्ल्यांवरचा मराठी भाषेतला सर्वात मोठा शिलालेख!!

लिस्टिकल
महाराष्ट्रातल्या तमाम गड-किल्ल्यांवरचा मराठी भाषेतला सर्वात मोठा शिलालेख!!

नाशिकहून सुरतेकडे जाणाऱ्या हमरस्त्यावरील प्रसिद्ध अशा सापुताऱ्याच्या अलिकडे हातगड नावाचा ऐतिहासिक किल्ला आहे. तिथेच नाशिकचे गिर्यारोहक आणि दुर्गअभ्यासक सुदर्शन कुलथे यांना मार्च २०१६ मध्ये हातगडावरील शोधमोहिमेदरम्यान मराठी (देवनागरी) भाषेतील सर्वात मोठा आणि आजपावेतो अप्रकाशित असा शिलालेख आढळून आला. या गडावर पहिल्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूने पश्‍चिमेकडे जाणारी एक पायवाट आहे. तिथून दगड फोडून तयार केलेल्या मार्गातून साधारण दुसर्‍या प्रवेशद्वारातून पुढे गेलं, की डाव्या बाजूला बाहेरच्या भिंतीवर चढून पलिकडे गेलं असता तिथे एक बुरूज दिसून येतो. सपाट आणि रुंद अशा या बुरूजासारख्या भागाला स्थानिक लोक राणीचा बाग म्हणून संबोधतात. या बुरूजावर चाफ्याची तसंच इतरही काही फुलझाडं दिसून येतात, म्हणून कदाचित हे नाव रूढ झालं असण्याची शक्यता वाटते. या राणीच्या बागेपासून कातळकड्याला चिकटून पश्‍चिमेकडे जाता येतं. कडा उजवीकडे ठेवत पुढे गेलं की उभ्या कातळभिंतीवर एक शिलालेख दिसून येतो. 

देवनागरी लिपीत कोरलेला संस्कृत भाषेतला तब्बल सोळा ओळींचा हा शिलालेख आहे. आजही चांगल्या अवस्थेत असलेला हा उभा आयताकृती शिलालेख उंचीने चार फूट तर रुंदीला दोन फूट चार इंच मापाचा आहे. शिलालेखालतील अक्षरे तीन इंच उंचीची आहेत. त्या जागेवर उभे राहिले असता शिलालेख हा जमिनीपासून साडेसहा फूट उंचीवर आहे. अधिक शोध घेतला असता संपूर्ण महाराष्ट्रातला देवनागरी भाषेतला हा सगळ्यात मोठा शिलालेख असल्याचे कळते. हा शिलालेख कोरीव प्रकारातला असून किल्ल्यावरील वापरात नसलेल्या अवघड अशा जागेवर उभ्या कातळकड्याच्या एका भिंतीवर आजही सुस्पष्ट स्थितीत दिसून येतो. मग इतकी वर्ष हा कुणाच्या नजरेस का पडला नाही? असा प्रश्‍न उपस्थित झाला.

कुठल्याही किल्ल्यावर किंवा वास्तूवर असणारे शिलालेख हे नेहमी दर्शनी भागावर कोरलेले असतात असं दिसून येतं. म्हणजेच हातगड किल्ल्यावरील वर जाण्याचा दगडी चर खोदून बोळीसारखा मार्ग हा नंतरच्या काळात तयार करण्यात आला असावा. त्या आधी या मार्गाने पश्‍चिमेकडे जाऊन तिथल्या टोकावरून वर जाणारी वाट अस्तित्त्वात असली पाहिजे. आजही ती वाट कळून येते, पण नंतरच्या काळात त्यावर दगडी तटबंदी उभी करून ती बंद झालेली आहे. त्यामुळे पूर्वी दर्शनी भागात असलेला हा महत्त्वाचा शिलालेख आडबाजूला आणि अडगळीत गेला. सुदैव असं की तो आजही अगदी स्पष्ट आणि वाचनीय आहे.

हातगड किल्ला येथे सापडलेल्या अप्रकाशित शिलालेखाचे वाचन-

हातगड किल्ला येथे सापडलेल्या अप्रकाशित शिलालेखाचे वाचन-

(हातगड किल्ला)

शिलालेख असलेला किल्ला – हातगड

तालुका - सुरगाणा, जिल्हा - नाशिक

शिलालेखाचे स्थळ - हातगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडून पश्चिमेकडे वर जाताना मार्गावरून डावीकडे (स्थानिकांच्या भाषेत) 'राणीचा बाग' म्हणून असलेल्या बुरूजावरून

१५ मीटर अंतरावर...

दिशा - दक्षिण

लिपी - देवनागरी

भाषा – देवनागरी (मिश्रित मराठी)

प्रकार - कोरीव

शिलालेखाचा आकार - (उभा) आयताकृती

आडवी लांबी (रूंदी) - २ फूट ४ इंच (२८ इंच)

उंची - ४ फूट

शिलालेखाचे जमिनीपासूनचे अंतर - ६ फूट ६ इंच

शिलालेखातील अक्षरांची उंची - ३ इंच

एकूण ओळी - १६

शिलालेखाचे वाचन -

शिलालेखाचे वाचन -

1) स्वस्ति श्री नृप विक्र मार्क स (स्य)

2) ....ती ... शाळिवाहन सकें

3)१४६९ प्लवंग संवत्सरे आषा

4) ढ क्षय ११ भौमे तद्दीने महाराजा

5) धिराज प्रौढ प्रताप चक्रवर्ती वेद मा

6) र्ग प्रवर्तक आचार परायण सा

7) रासार विचारक प्रताप नाराय

8) ण धर्मधुरीण सकळ वेद शा

9) स्त्र कोविद राष्ट्रौड बागुल मुगु

10) ट मणी.... वा....... श्री मा

11) न ब्रह्मकुळ प्रदिप श्री महादेव

12) सूत तपश्री.... परित श्री

13) रा (जा) धीराज बहिरम (भैरव) सेन राजा

14) जबळ पराक्रमे हातगा दुर्ग वेढा

15) घालुनु (न) नीजाम सहा (शहा) पासुन

16) घेतला..... विजयी भव

शिलालेखाचा शोध आणि वाचन - सुदर्शन कुलथे, नाशिक
शिलालेखाचे भाषांतर - गिरीश टकले, नाशिक
शिलालेखाचे प्रयोजन - बागुलवंशी राजांच्या पराक्रमाबद्दल

शिलालेखाचा आशय / निष्कर्ष -

हा शिलालेख शालिवाहन शके१४६९ सालच्या आषाढ माहिन्यात क्षय एकादशीला कोरलेला आहे. म्हणजेच इ.स. १५४७ साली कोरलेल्या शिलालेखाला आज ४७० वर्ष पूर्ण झालेली आहेत. जवळपास पाचशे वर्षं जुन्या शिलालेखात बागुलवंशी राजांच्या पराक्रमाबद्दलच्या ओळी सापडल्या आहेत. या शिलालेखात बागलाण प्रांतातील बागुलराजे जे स्वतःला राष्ट्रौढ वंशीय म्हणत असत, यांच्या विजयाचा आशय आहे. बागुलवंशातील राजा महादेवसेन यांचा पुत्र भैरवसेन यांनी अहमदनगर निजामाच्या ताब्यातून हातगड किल्ल्याला वेढा घालून किल्ला जिंकल्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. सोळाव्या शतकाच्या मध्यावर अहमदनगरचा बुरहान निजामशहा हा या भागातल्या राजवटीतला बलाढ्य राजा होता. त्याच्या ताब्यात असलेला मोक्यावरच्या ठिकाणी वसलेला हातगड किल्ला मिळवणे हा बागुलवंशीय भैरवसेन राजाचा मोठा पराक्रम होता. हे या शिलालेखावरून स्पष्ट होते. बागुलवंशीय राजांच्या दरबारी असलेल्या रूद्र कवी विरचित 'राष्ट्रौढवंशम् महाकाव्यम्' या ग्रंथात भैरवसेन यांनी 'हस्तगिरी' किल्ला ताब्यात घेतल्याचाही उल्लेख आलेला आहे. यावरून हातगड विजय या शिलालेखालातील मजकूराला अधिक पुष्टी मिळाली आहे

शिलालेखाचे महत्त्व - महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवरील एकूण शिलालेखांत मराठी (देवनागरी) भाषेतील सर्वांत मोठा शिलालेख.
हातगडावरील महाद्वाराच्या कमानीत बसविलेले इतर दोन शिलालेख

शिलालेख क्र. १

प्रवेशद्वार क्र. १ च्या कमानीत बसविलेल्या या शिलालेखाचं वाचन -
‘श्री प्रतापस्य ही कारकीर्द शेवुजी पंडीत यांचे सर्व सूत्रसर्व छत्र छायेत आहेत. हिंदू पंडीत शेवुजी’
उंची ११.५ इंच, रूंदी १३ इंच, ओळी ४

 

शिलालेख क्र. २

प्रवेशद्वार क्र. १ च्या उजव्या बाजूकडील भाग कोसळल्याने त्या जागेवर खाली असलेल्या ह्या शिलालेखाचे वाचन -
‘नवीन श्रीपती प्रतापस्य कारकीर्द त्रासजी पंडीत सुत्र सर्व छत्र छायेत’
उंची ११.५ इंच, रूंदी १३ इंच, ओळी ४

संपर्क सुदर्शन कुलथे 9422258058

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख