मांझी सिनेमा तुम्ही पाह्यला असेल. पाह्यला नसला तरी तो कशाबद्दल आहे हे तर नक्कीच माहित असेल. नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा दशरथ मांझी या बिहारच्या अफलातून माणसावर बेतला आहे. एका डोंगरामुळे पलिकडच्या गावी वेळेत पोहोचता आले नाही, त्यामुळे आपल्या पत्नीचा जीव गेला. पण वेळ इतरांवर येऊ नये म्हणून त्यांनी चक्क २२ वर्षं एकट्याने तो डोंगर पोखरून काढला. त्यांची कहाणी या सिनेमामुळे सर्वांपर्यंत पोहोचली. पण हे एकच असे मांझी नाहीत. बिहारमधल्या गया येथेही असाच एक दुसरा मांझी आहे.
बिहारमधील गया जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न मोठा आहे. त्यावर उपाय करण्यासाठी लौंगी भुईया नावाच्या भन्नाट माणसाने तब्बल ३० वर्षं राबून डोंगरापासून गावापर्यंत कालवा खणून गावाला पाणी मिळवून दिलं आहे. गया जिल्ह्यातल्या कोठीलवा गावात लौंगी भुईया यांनी ३० वर्षं एकट्याने राबत ३ किलोमीटर लांब कालवा तयार करून दाखवला आहे.





