फेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं?? वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....

लिस्टिकल
फेसबुकवर चोर-पोलीस कमेंट-कमेंट खेळतात तेव्हा काय होतं?? वाचा बरं या गंमतीचा शेवट काय झाला....

आज आपण बोलणार आहोत वॉशिंग्टनच्या चोर-पोलीस खेळाबद्दल. पूर्वी पोलीस वाँटेड असलेल्या व्यक्तीचा फोटो गावभर लावायचे. आजच्या काळात गावच्या भिंतींची जागा सोशल मिडीयाच्या भिंतीने घेतली आहे. वॉशिंग्टनच्या रिचलँँड पोलिस विभागाने ‘अँथनी एकर्स’ नावाच्या गुन्हेगाराचा फोटो फेसबुकवर शेअर केला होता. आता गुन्हेगार स्वतःच्याच फोटोखाली का कमेंट करेल ना? पण या महाशयांनी तेच केलं. ‘अँथनी एकर्स’ ने कमेंट मध्ये अचानक प्रकट होऊन सगळ्यांनाच धक्का दिला...... पाहा बरं, पुढे काय घडलं!!

त्याचं झालं असं की ‘अँथनी’वर गुन्हा सिद्ध झाला होता पण त्याने स्वतःला पोलिसांच्या ताब्यात केलं नव्हतं. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते. हा बहाद्दर सापडला ते त्याच्या फोटोच्या कमेंट सेक्शन मध्ये. तो म्हणाला की “शांतता ठेवा, मी लवकरच सरेंडर करणार आहे.” यावर पोलिसांनी उत्तरात त्यांच्या कामाची वेळ सांगून टाकली, आणि ‘जर गरज पडली तर आम्ही तुझ्या प्रवासाची (उर्फ उचलण्याची) व्यवस्था करू” अशी पुस्ती जोडली.

इथून पुढे चोर पोलिसाचा खेळ सुरु झाला राव. अँथनी म्हणाला की ‘माझी काही कामं अडली आहेत, त्यामुळे मी लगेच येऊ शकणार नाही, पण पुढच्या ४८ तासात मी सरेंडर करेन’. शब्द पाळेल तो ठग कसला. अँथनी आलाच नाही. पुढच्या काही दिवसात लोकं पोलिसांना विचारू लागली, की त्याने सरेंडर केलं का ? हे तुम्ही खालील कमेंट्स मध्ये पाहू शकता.

मंडळी, दिलेला शब्द पाळला नाही म्हणून मग अँथनी एकर्स’ने एक लांबलचक पत्रक पोस्ट केलं. त्याने म्हटलं की, “मी माझा शब्द पाळू शकलो नाही याबद्दल मी माफी मागतो पण मी उद्या दुपारच्या जेवणापर्यंत येईन. मला माहित आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, पण मी प्रॉमिस करतो की मी जर दिलेल्या वेळेत येऊ शकलो नाही, तर तुम्हाला संपर्क करून मला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याची विनंती करेन.’ शेवटी त्याने पोलीस विभागालाच ‘You’re beautiful.’ म्हटलं!!

पोलीस आणि चोराचा हा रोमान्स कमेंट मधूनच चालू होता पण हा पठ्ठ्या प्रत्यक्ष काही पोलिसांना सरेंडर झाला नाही. मग पोलिसांनी पुन्हा एकदा कमेंट मध्ये ‘तू कधी येतोय बाबा’ अशा आशयाची पोस्ट लिहिली.

आणि मग एक दिवशी चमत्कार झाला. अँथनीने स्वतःचा पोलीस स्टेशन मधला फोटो पोस्ट करून म्हटलं ‘आपल्या डेटसाठी मी हजर आहे’.....

या सगळ्यात काय घडलं ? तर, सोशल मिडीयावरच्या पब्लिकचं छान मनोरंजन झालं.

टॅग्स:

marathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख