महिला वैज्ञानिक म्हटल्यावर तुमच्या डोळ्यांसमोर कसं चित्र उभं राहतं? सर्वसाधारणपणे आखूड कापलेले केस, डोळ्यांना चष्मा, कुंकू-बांगड्या-मंगळसूत्र आदींना सोडचिठ्ठी, चेहर्यावर बुद्धीचं आणि आत्मविश्वासाचं तेज आणि फार फॅशनेबल नाही तरी वापरायला आरामदायी असे कपडे. नेमका याच प्रोटोटाईपला छेद देत साडी, तीपण अनेकदा छानपैकी कांजीवरम, कपाळावर मोठी ठसठशीत टिकली, मानेवर सैलसर अंबाडा अशा पोशाखात वावरणारी अन त्याचवेळी ऑरगॅनिक केमिस्ट्रीसारख्या विषयात लीलया संचार करणारी एक मुलखावेगळी स्त्री शास्त्रज्ञ आपल्या देशात होऊन गेली. तिचं नाव 'दर्शन रंगनाथन'.
या' महिला शास्त्रज्ञाने संशोधनासाठी दिल्लीहून लंडनला चक्क फणस मागवून घेतला होता!


दर्शनचा जन्म दिल्लीचा. करोलबागचा. शांतिस्वरूप आणि विद्यावती मार्कन यांचं हे तिसरं अपत्य. दिल्लीतच तिचं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. त्यादरम्यान एस. व्ही. एल रतन या शिक्षकांकडून तिला प्रेरणा घेऊन तिनं केमिस्ट्रीमध्ये करिअर करायचं ठरवलं. तिथूनच सुरू झाला एक अद्भुत, रोमांचकारी प्रवास. आधी दिल्ली युनिव्हर्सिटीतून पदवी, मग तिथूनच पीएचडी, दरम्यान मिरांडा कॉलेजमध्ये अध्यापन, रॉयल कमिशन फॉर द एक्झिबिशनकडून मिळालेली सीनिअर रीसर्च स्कॉलरशिप, लंडनच्या इम्पीरिअल कॉलेजमधला पोस्ट डॉक्टरल वर्कचा अनुभव अशी अनेक वळणं या प्रवासादरम्यान आली. या सगळ्यात विशेष लक्षणीय गोष्ट म्हणजे तिचं संपूर्ण करिअर तिला मिळालेल्या फेलोशिप्समधून उभं राहिलं.

इम्पीरिअल कॉलेजमध्ये तिचा ऑरगॅनिक केमिस्ट्रीमधला रस वाढत गेला. मग तो फणसामध्ये असलेल्या सायक्लोआर्टेनॉल या स्टेरॉलचा(ही एक प्रकारची चरबीच) अभ्यास असो किंवा ज्यांना आपण स्टेरॉइड्स म्हणून ओळखतो त्यांच्यामधील प्रकाशरासायनिक क्रियांचा अभ्यास असो.
सायक्लोआर्टेनॉल हे वनस्पतींमध्ये आढळणारं संयुग. यातही एक गंमत झाली. तिच्याबरोबर काम करणार्या प्राध्यापकांचा या संयुगाच्या रचनेबाबत जरा गोंधळ होता. त्यामुळे त्यांना ही रचना कशी असते हे प्रत्यक्ष ताडून पाहायचं होतं. पण लंडनमध्ये तर फणस नव्हताच त्यावेळी. तेव्हा या पठ्ठीनं काय केलं असेल, तर चक्क आईला दिल्लीहून फणस पाठवायला सांगितला! सुकवलेल्या अवस्थेत. त्यामुळे त्या प्राध्यापक महाशयांचं काम मात्र सोपं झालं.

तिचं क्षितिज मात्र एवढंच नव्हतं. प्रोटीन फोल्डिंग म्हणजे प्रथिनांच्या साखळ्या तयार होऊन त्यांपासून अवकाशात जागा व्यापणारी त्रिमितीय रचना तयार होण्याची क्रिया, सुपरमॉलेक्यूल म्हणजे विद्युतचुंबकीय बंधांद्वारे रेणू एकमेकांशी जोडले जाऊन तयार होणारी संरचना हेही तिच्या संशोधनाचे विषय होते. ऑरगॅनिक केमिस्ट्रीच्या अनोख्या दुनियेशी तिची नाळ इतकी घट्ट होती की आयुष्याच्या अखेरच्या पाच वर्षांत तिचे डझनभर लेख जर्नल ऑफ अमेरिकन केमिकल सोसायटीमध्ये प्रकाशित झाले होते.
भारतात परत आल्यावर तिचं लग्न झालं आणि त्यानंतर लगेचच कानपूर आयआयटीमधल्या प्रयोगशाळेत ती रुजू झाली. लग्नानंतरचं सहजीवन खर्या अर्थाने सुरू झालं. आपल्या नवर्याबरोबर सगळे रिसोर्सेस वाटून घेणं, एकत्र संशोधन, एकत्र लेखन सुरू झालं. शिवाय तिने अनेक जर्नल्समधूनही लिखाण केलं.

इंडियन अॅकेडमी ऑफ सायन्सेस, इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमी या संस्थांकडून फेलोशिप, ए. व्ही. रामा राव फाऊंडेशन पुरस्कार, थर्ड वर्ल्ड अॅकेडमी ऑफ सायन्सेस अवॉर्ड असे अनेक पुरस्कार तिच्या खाती जमा आहेत. पण ती आज या जगात नाही.४ जून २००१ या दिवशी तिनं अखेरचा श्वास घेतला. हाच दिवस तिचा जन्मदिवसही होता, आणि लग्नाचा वाढदिवसही! ब्रेस्ट कॅन्सरसारख्या आजाराने तिची आयुष्याबरोबरची केमिस्ट्री संपुष्टात आणली हा दुर्दैवी योगायोग.
लेखिका : स्मिता जोगळेकर
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१