होय... हे मुंबईतलेच चित्र आहे. याआधी एखादा नाला, तलाव, किंवा समुद्राच्या पाण्यावर तरंगणाऱ्या हजारो, लाखो प्लास्टिकच्या पिशव्या, रिकाम्या बाटल्या, कचरा तरंगताना आपण पाहिलेला आहे. त्याची नजरेला एवढी सवय झाली आहे, की कचरा-प्लास्टिकचा थर नसेल तर त्याखाली पाणी असते यावर आपला विश्वासही बसत नाही. हा थर बाजूला केला, की त्याखाली जे हिरवंकाळं दिसतं, त्याला आपण पाणी मानतो. त्यात पाण्याचा अंश किती आणि प्रदूषणकारी रसायनांचा अंश किती हा विचारही मनात येत नाही.
कारण, म्हणतात ना, मुंबईचं पाणीच वेगळं!
पण आता मुंबईचं ते पाणी वेगळं राहिलेलं नाही. ते बदलतंय... आता नद्या, नाले, तलाव, किनारे कात टाकू लागले आहेत, आणि खरंखुरं पाणी दिसू लागलं आहे. जिथे पाणी असतं, तिथे प्राणी रमतात. मुंबईत आता प्राणी, पक्षी रमताना दिसतायत.





