एका तंबूत अमेरिकेचे उपराष्ट्रपती निवांत बसून पाईप ओढतायत आणि पुढच्याच तंबूत जपानचे राजे बसलेत. एका तंबूत इंग्लंडचे राजकुमार आहेत तर दुसऱ्या तंबूत भारताचे राष्ट्रपती. हे सगळे लोक तीन दिवसांसाठी एका छताखाली आले आहेत. मौजमजा चालली आहे, रोज शेकडो वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारले जात आहेत. दारू पाण्यासारखी वाहात आहे. वाळवंटात हिरवंगार नगर उभं राहिलं आहे. सामान्य माणसांचे डोळे दिपवणारा हा सोहळा आहे.
हे सगळं ज्या देशात चाललं होतं त्या देशातली जनता काय करत होती? त्यांना तर या रम्य नगरात प्रवेशच नव्हता. ते लोक आंदोलन करत होते. तरुणांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं. संशय आला की राजाचे गुप्त सैनिक कोणतीही विचारपूस न करता तुरुंगात डांबायचे. असं सगळं सिनेमातल्या कथेसारखं चाललं होतं.
















