गावात अचानक गर्दी वाढू लागली. शेकड्यांनी बाहेरून आलेल्या लोकांचा ताण या परीसरावर दिसू लागला. लोकांनी याठिकाणी कशी झुंबड उडवली आहे, हे दाखवणारा व्हिडीओ अहमद अल्गोबरी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या डोंगरावरील माती नेऊन ती धुतल्यानंतर त्यातून सोने कसे मिळते हे देखील त्या व्हिडीओ मध्ये दाखवण्यात आले आहे. काही जण जमीन खोदण्यासाठी हत्यारांचा वापर करत आहेत तर काही जण अधाशाप्रमाणे हातानेच जमीन उकरत आहेत. मिळेल त्या साधनातून ही माती घरी घेऊन जाण्याचा अट्टाहास बघून इथले प्रशासन देखील चिंतेत पडले आहे.
लोकांच्या वाढत्या गर्दीमुळे काही तरी अघटीत होईल की काय अशी भीती प्रशासनालाही वाटू लागली. कारण, सोन्याच्या आमिषाने लोकांना पूर्ण आंधळे बनवले आहे. त्यामुळे आता नागरिकांना या डोंगरावर जाण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे.
कांगोचे मंत्री वेनंट बुरुमे यांनी सांगितले की, ‘या छोट्याशा गावात जर अचानक बाहेरून येणाऱ्याची संख्या वाढली तर काहीही अघटीत होऊ शकते. याची कल्पना आल्याने त्या डोंगरावर खोदकाम करण्यासंबंधी आम्ही बंदीचे आदेश दिले आहेत.'
ज्यांना इथे खाणकाम सुरु करायचे असेल अशा अधिकृत खाणकामाचा परवाना असलेल्यांनी आपला परवाना दाखवून मगच तिथे खोदकाम सुरु करायचे आहे, असेही ते म्हणाले. ज्यांच्या खाणकामाचे परवाने रद्द झालेले असतील त्यांच्या परवान्यांचेही नुतनीकरण करून देण्याची सोय केलेली आहे.
या सगळ्या कामासाठी अधिकाऱ्यांची फौजच या ठिकाणी तैनात आहे. शिवाय, लोकांच्या वाढत्या संख्येमुळे काहीही अघटीत घडू नये म्हणून सेना आणि पोलीस दल दोघांनाही इथे पाचारण करण्यात आले आहे.
खरे तर या परिसरात अशा प्रकारे सोन्याची खाण सापडणे हे काही फार मोठी आश्चर्याची गोष्ट नाही. सोन्याचीच नाही तर इतरही अनेक प्रकारच्या खनिजांच्या खाणी या ठिकाणी सापडत असतात. अशा खाणींवर काम करणे हेच इथल्या लोकांच्या रोजगाराचे साधन आहे. पण, गेल्याच आठवड्यात सापडलेल्या या खाणीमुळे लोकांच्यात जास्तच आकर्षण आणि लोभ निर्माण झाला. या परिसरात अशा खाणींची संख्या खूप आहे. तरीही या देशात गरिबी आहे. कारण, या खाणीतील सोने किंवा इतर खनिजे ही सरकारी कर चुकवून नेली जातात. आफ्रिकेच्या पूर्वेकडील देशाचा यामध्ये खूप मोठा हस्तक्षेप आहे. या देशातील अनेक लोकं आफ्रिकेत मिळणाऱ्या अशा खनिजांचा चोरटा व्यापार करतात. त्यामुळे इथल्या सरकारकडे याचा कर जमा होत नाही. इथे सोन्याच्या खाणी सापडत असल्या तरी इथे सोन्याच्या दागिन्यांची निर्मिती करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. यामुळे इथे महागाई सारख्या समस्यांची खूपच तीव्रता जाणवते. चोरट्या मार्गाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हे सोने आधीच पोहोचलेले असते. त्यामुळे सरकारला याचा जास्त नफा कमावता येत नाही.
हेच कारण आहे ज्यामुळे आफ्रिकेत सोन्याच्या खाणी सापडत असूनही तिथले दारिद्र्य आणि गरिबी आणखीन वाढत आहे. त्यामुळे सोन्याच्या तस्करीवर रोख लावण्यासाठी सरकारने आता काही गंभीर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सोन्याचा हाच व्यापार जर कायदेशीर मार्गाने झाला तर निश्चितच कांगो मधील जनतेची परिस्थिती बदलण्यास हातभार लागेल.
अशा चोरट्या व्यापारावर बंदी घालण्याचे, कडक निर्बंध लादण्याचे प्रयत्न सुरु आहेत मात्र कांगो सरकारला त्यात अजूनही पुरेसे यश मिळालेले नाही. सध्या तरी सरकारने लुहिनीमधीलच नाही तर इतर खाणींच्या खोदकामावरही बंदी घातली आहे. यादरम्यान खाणमालकांना त्यांची ओळख पटवून देता येईल आणि कायदेशीररीत्या योग्य पद्धतीने खाणकाम सुरु होईल. या खाण मालकांनी खाण नियामक मंडळाकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे, तरच त्यांना परवानगी देण्यात येईल, अशी मंत्री वेनंट बुरुमे यांनी दिली.