९ मार्च १९५९ ला 'बार्बी' जन्माला आली. न्यूयॉर्कच्या एका खेळण्यांच्या प्रदर्शनात बार्बीचे आगमन झाले तेव्हा व्यापारी ही बाहुली विकायला फारसे उत्सुक नव्हते. तेव्हाच्या 'ठकी' सारख्या दिसणार्या बाहुल्या आणि रांगणारी 'बबड्या' सारखी बाळं हीच खेळणी बाजारातली लोकप्रिय खेळणी होती. पण बार्बी थोड्याच अवधीत लोकप्रिय झाली आणि आज ६२ व्या वर्षीही तशीच चिरतरुण आहे.
रुथ हँडलर हे बार्बीच्या आईचे नाव! रुथला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये होती. या मुलांच्या खेळण्यांकडे बघताना रुथच्या लक्षात आले की मुलाच्या खेळण्यात सैनीक -डॉक्टर- अंतराळवीर अशी खेळणी असल्याने तो भविष्यात कसा दिसेल याबद्दल स्वप्न रंजन करू शकत होता, पण मुलीकडे असलेल्या बाहुल्या तिला भविष्यात फक्त 'आई' ही एकच भूमिका दाखवत होत्या.
















