गेले एक वर्ष संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोव्हीड-१९ ची लस आता १६ जानेवारीपासून भारतात वापरली जाणार आहे. थोडा दिलासा मिळत असतानाच आता या विषाणूने नवे रूप धारण केले आहे. ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत या कोरोनाच्या नव्या प्रारुपाने पुन्हा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जरा कुठे आशादायी वातावरण निर्माण होत असतानाच अचानक पुन्हा निराशेचे मळभ दाटून आले आहे.
असे असले तरी या सगळ्या परिस्थितीतही एक आशेचा किरण डोकावतो आहे. कोव्हीड-१९ च्या लसीचा वापर करून भविष्यात कॅन्सर सारखा भयानक आजारही बरा होऊ शकेल असे शास्त्रज्ञांना वाटते आहे. दरवर्षी जगभरात फक्त कॅन्सरमुळे दगावणाऱ्यांची संख्या एक कोटीपेक्षाही अधिक आहे.










