आपल्या मनासारखं झालं नाही की लहान मुलं जसं रडून, आरडाओरडा करून, हातपाय आपटून गोंधळ घालतात तसंच काहीसं सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राजमान्य राजश्री डॉनल्ड ट्रम्प करत आहेत. गेल्या आठवड्यात तर या गोंधळाने सर्वोच्च बिंदू गाठला. डॉनल्ड ट्रम्पच्या हजारो समर्थकांनी बुधवारी कॅपिटल बिल्डिंगवर (अमेरिकेचं संसद भवन) हल्ला केला आणि पोलिसांशी झटापट केली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला.
कॅपिटल बिल्डींगमध्ये ट्रम्प समर्थकांनी राडा केला याला पार्श्वभूमी आहे ती ट्रम्प यांनी ट्विटरवरून केलेल्या चिथावणीखोर विधानांची. याची शिक्षा म्हणून ट्विटर या कंपनीनं ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यात ट्विटरमधल्या एका भारतीय वंशाच्या महिलेची प्रमुख भूमिका होती. विजया गड्डे हे त्यांचं नाव. त्या ट्विटरमध्ये कायदे आणि धोरण ठरवणाऱ्या समितीच्या प्रमुख आहेत. विजया गड्डे यांनीच डॉनल्ड ट्रम्प यांचे ट्विटर खाते रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे त्या सध्या चर्चेत आहेत.







