(सुनील सावंत उर्फ सावत्या)
रागावलेल्या कमिशनरनी पुन्हा एकदा सहेल बुध्दाला फोन केला आणि विचारलं, "अजून कोणाचाही पत्ता नाही काय आहे हा प्रकार". त्यावर मी सर्वांनाच वेळेवर पोहचायचा निरोप दिला होता, असं म्हणत पुन्हा फोन करून सांगतो असं सोहेल बुध्दाने कमीशनर राकेश मारियांना सांगीतलं. अपेक्षेप्रमाणे दहा मिनिटात त्याचा फोन आलाच "साहेब मी सगळ्यांना असेल तसे निघून या, रात्री दिल्लीला जायचं आहे असा निरोप दिला होता पण आज १ एप्रिल असल्यामुळे सगळ्यांना तो 'एप्रिल फूल'चा प्रकार वाटला आणि कोणीही आलं नाही. आता मी पुन्हा फोन केल्यावर परिस्थितीचं गांभिर्य सगळ्याना कळलंय आणि सर्व ऑफिसर्स थोड्याच वेळात पोहचतील सर".
कमिशनर राकेश मारियांनी कपाळावर हात मारून घेतला. मुंबई पोलीस कमिशनरांचा निरोप 'एप्रिल फूल' समजणार्या अधिकार्यांचा त्यांना भयंकर राग आला होता. थोड्याच वेळात सर्व ऑफीसर माना खाली घालून त्यांच्या समोर उभे राहीले. साहेबांचा राग त्यांना दिसत होताच आणि त्यामुळे त्यांच्या नजरेला नजर देण्याची हिम्मत कोणातही नव्हती, पण आता ती चर्चा करण्याची वेळ नव्हती. चार वाजून गेले होते. साडेसात वाजता मुंबई -फिरोजपूर सुटणार होती. त्याआधी प्लॅन बनवून कामाला सुरुवात करायची होती.
एप्रिलचा महीना. फिरोजपूरला जाणार्या गाडीत सर्वसाधारणपणे १६०० माणसं प्रवास करत असतात. सुटीचा सिझन सुरु झाला असल्याने दोन जास्तीचे डबे जोडण्यात आले होते म्हणजे एकूण २००० लोकांमधून त्या शूटर्सना ओळखून ताब्यात घ्याचं होतं. त्यात अनेक धोके होते. गर्दीत त्यांना पकडणं कठीण होत. कदाचित त्यांच्याकडे शस्त्रं असली नाहक प्रवाशांच्या जीवाला धोका होता. पोलीस त्यांच्या युनीफॉर्ममध्ये जाऊ शकत नव्हते. गँगस्टर मुंबईहूनच चढतील यांची खात्री नव्हती. अगदी समजा ते शूटर्स दिसले आणि त्यांना संशय आला तर ते मधल्या एखाद्या स्टेशनवर उतरून गेले तर पोलीस काहीच करू शकत नव्हते.