अमेरिकन गुप्तचर संस्था एफबीआय ही प्रचंड कार्यक्षम यंत्रणा समजली जाते. आजवरच्या इतिहासात त्यांनी कठीणातल्या कठीण केसेस सोडवून दाखवल्या आहेत. पण एक केस मात्र त्यांनाच नाहीतर संपूर्ण अमेरिकेसमोर कोडे बनून राहिली आहे. असे कोडे जे आजही सुटू शकलेले नाही.
गोष्ट ५० वर्ष जुनी आहे. १९७१ सालची. एक व्यक्ती सुटाबुटात हातात काळ्या रंगाची बॅग घेऊन अमेरिकेच्या एयरपोर्टवर गेला. या इसमाचे नाव डॅन कूपर होते. त्याला डीबी कूपर नावाने देखील ओळखले जायचे. त्याने काउंटरवर जाऊन सियाटलला जाणारी फ्लाईट बोइंग ७२७ चे तिकीट घेतले. त्यांनंतर तो विमानात गेला आणि त्याला मिळालेल्या सीटवर जाऊन बसला. पण इतर प्रवाशांप्रमाणे त्याने आपली बॅग वर न ठेवता स्वतःच्या मांडीवर ठेवली. त्याने काळा सूट, स्टायलिश टाय आणि सनग्लासेस घातले होते. उंचापुरा आणि जवळपास चाळीशीतला वाटणारा हा कूपर पुढे काय कांड करणार याबद्दल कुणालाही अंदाज नव्हता.










