(प्रातिनिधिक फोटो)
मुंबईसारख्या महानगरात खून, खूनाचे प्रयत्न असे गुन्हे रोजच घडत असतात. जुनी दुष्मनी, पैशाची लेनदेन, फिसकटलेले व्यवहार, प्रेमप्रकरणं, नशेत असताना झालेली बाचाबाची अशी याची एक नाही, अनंत कारणे असतात. बऱ्याच वेळी एखाद्याला मारून टाकणे हा उद्देशही नसतो, पण कोणाच्या तरी हातून हत्या घडते.
पण १९९४ च्या सप्टेंबर महिन्याच्या एका रविवारी संतोष पाटोळे नावाच्या २८ वर्षाच्या तरुणाची गोळ्या घालून झालेली हत्या म्हणजे ठरवून, योजना आखून, हत्येच्या उद्देशानेच केलेले कारस्थान होते. बरं, ज्याची हत्या झाली तो तरुण उद्योगपती, राजकारणी, सेलेब्रिटी, असा काहीच नव्हता. तो सहार विमानतळाच्या पोस्ट ऑफीसध्ये काम करणारा एक पोस्टमन होता. पोस्टमन म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो तो खाकी कपड्यातला, खांद्यावर पत्रांची झोळी घेऊन उन्हातान्हात, पावसात फिरणारा आणि वर्षानुवर्षं दिवाळीला आठवणीने पोस्ट घेणारा असा सर्व सामान्य माणूस! अशा माणसाची हत्या, आणि ती पण धंदेवाईक मारेकऱ्यांच्या हस्ते गोळ्या झाडून व्हावी याचे पोलिसांना नवलच वाटत होते.










