गोरी गोरी पान, फुलासारखी छान!! दादा मला एक वहिनी आण !! अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गाण्यांनी लहानपणापासूनच आपल्या मनावर गोरेपणाचे वेड बिंबवलेले असतं. मग तेच शिकत आपणही मोठे होत जातो. बरं हे आजचं वेड नाही तर शेकडो वर्षं जुनं वेड आहे. आपला संपूर्ण समाजच गोर्या रंगाचा मानसिक गुलाम आहे. कदाचित गोर्यांनी केलेल्या दिडशे वर्षांच्या राज्यामुळे समजूत आणखीनच घट्ट झाली असावी. त्यामुळेच 'गोर्या रंगाचा बाजार' आपल्याकडे कळत न कळत वाढतच गेला.
एखादी सावळी मुलगी दिसली की लगेच शेजारीपाजारी, म्हातारे-कोतारे, नातेवाईक सर्व लोक तिच्यावर सूचनांचा भडीमार करत असतात. तू केशर दूध पीत जा, तू अमुकतमुक बापूंचा लेप लावत जा, तू सकाळी सकाळी गुलाबजल लाव, अमुक कंपनीचा फेसवॉश वापर, जास्त चहा पिऊ नको, उन्हात जाऊ नको,गुलाबी कपडे वापरत जाऊ नको. इतकंच नव्हे तर आपल्या मुलीला कुणी थेट काळं म्हणू नये
ती सावळी आहे, गव्हाळ आहे, निमगोरी आहे, वगैरे असं वर्णन केलं जातं. हळदीचा लेप ते स्किन ग्राफ्टींग म्हणजे प्लास्टीक सर्जरी अशा सारख्या अनेक उपायांनी गोर्या रंगाचा पाठलाग केला जातो आहे. बोभाटाच्या एका लेखातून या सामाजिक समजूती बदलणार नाहीत पण हे 'गोरे' बनवण्याचे उपाय खरोखर रंग बदलतात की हे उपाय म्हणजे निव्वळ थेरं आहेत हे आज आपण बघू या !












