देशाचे सीमेवर रक्षण करणारे सैनिक हे देशाची खऱ्या अर्थाने संपत्ती असतात. या सैनिकांना विविध सन्मान देऊन त्यांचा गौरव सरकारकडून केला जात असतो. यात क्रांती चक्र, परमवीर चक्र अशा पदकांचा समावेश असतो. यांपैकी थेट शत्रूच्या उपस्थितीत रणमैदानावर शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांना परमवीर चक्र प्रदान करण्यात येत असते. या वीरांना आदरांजली अर्पण करत बोभाटा आजपासून एक नवी मालिका सुरू करत आहे. या मालिकेत आपण परमवीर चक्र विजेत्या सैनिकांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या पराक्रमाचा ठाव घेणार आहोत.
आजचा पहिला लेख हा १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात असामान्य शौर्य गाजवणाऱ्या अब्दुल हमीद यांच्याबद्दल आहे. १९६५ च्या युद्धात त्यांनी शत्रूसेनेचे ७ रणगाडे उध्वस्त केले होते. या युद्धातील त्यांच्या पराक्रमाचे किस्से आजही देशभर चर्चिले जातात. शत्रूशी लढताना त्यांनी स्वतःचे प्राण अर्पण केले होते.







