छोट्याश्या झोपडीत राहणारा मुलगा आज IIM सारख्या प्रतिष्ठित संस्थेत प्राध्यापक म्हणून काम करतोय. ही यशोगाथा आहे रणजित रामचंद्रन यांची. कठीण परिस्थितीतही केवळ दुर्दम्य इच्छा असल्यावर माणूस स्वतःचे स्थान कसे बनवतो याची ही कहाणी. नुकतेच त्यांनी फेसबुकवर फोटोसहित त्यांचा खडतर प्रवास शेयर केला आहे. लहानपणी ते राहत होते त्या वीट आणि प्लास्टिकचे छप्पर असलेले झोपडीवजा घराचा फोटोही त्यांनी पोस्ट केला आहे.
रणजित रामचंद्रन केरळमधील कासारगोडला बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंजमध्ये रात्री गार्ड म्हणून नोकरी करायचे आणि दिवसा पायस कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे शिक्षण घेत होते. नंतर त्यांना आय.आय.टी. मद्रासमध्ये प्रवेश मिळाला.पण त्यांना फक्त मल्याळम भाषा माहित होती, म्हणूनच त्यांनी पीएचडी सोडण्याचा विचार केला. पण त्यांचे गुरू डॉक्टर सुभाष यांनी त्यांना समजावून सांगितले व Phd पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केले. रामचंद्रन यांनी कठीण परिस्थितीत झगडत मागच्या वर्षी डॉक्टरेट पूर्ण केली. सध्या ते आयआयएम रांची येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम पाहतात.






