सौंदर्याची व्याख्या करताना पहिला निकष असतो तो म्हणजे रंग. व्यक्ती सुंदर असेल तर ती रंगानं गोरी असायलाच हवी हा समज जगात सर्वदूर आढळतो. आपल्याकडील 'गोरी गोरी पान फुलासारखी छान...' सारखं गाणं असू दे किंवा "तुझा गोरा रंग, तुझे गुलाबासारखे गाल मला फुलाकडे आकर्षित होणाऱ्या हनीबेअरप्रमाणे आकर्षित करतात'' असं म्हणणारा एखादा इंग्लिश कवी. सौंदर्य बघताना व्यक्तीच्या रूपाखाली तिची गुणवत्ता मात्र झाकोळली जाते हे कटुसत्य आहे.
याचा प्रत्यय २०१९ साली निस्सीन या जपानी कंपनीच्या जाहिरातीच्या निमित्ताने आला आहे. नाओमी ओसाका या टेनिसपटूला घेऊन या कंपनीने आपल्या नूडल्सची जाहिरात केली. त्यासाठी तिचं एक ऍनिमेटेड कॅरॅक्टर तयार करण्यात आलं आणि तेही तिचा मूळ रंग बदलून, तिला गोरं दाखवून!







