या फोटोचं नाव आहे ‘किस ऑफ लाईफ’. १७ जुलै १९६७ साली फ्लोरिडाच्या रोको मोराबितो या फोटोग्राफरने हा फोटो घेतला होता. या फोटोने पुढे जाऊन पुलित्झर प्राईज जिंकलं होतं. आता जाणून घेऊया या फोटोमागची कथा.
फोटोमध्ये विजेच्या खांबावर एकजण उलटा तरंगताना दिसतोय तर दुसरा माणूस त्याला किस करताना दिसतोय. पण हे चुंबन चुंबन नसून तो दुसरा माणूस पहिल्या माणसाच्या आत प्राण फुंकत आहे. त्याचं झालं असं की १७ जुलै १९६७ या दिवशी रोको मोराबितो कामावरून परतत असताना त्याने पाहिले की काही कामगार विजेच्या खांबावर चढून काम करत आहेत. रोकोला निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर हे दृश्य फोटोग्राफीसाठी योग्य वाटलं. कोणत्या पद्धतीने फोटो काढता येईल याचा विचार करत असताना त्याला लोकांच्या आरडाओरडा ऐकू आला.
एका खांबावरील कामगारांने चुकून विजेच्या शक्तिशाली तारेला हात लावला होता आणि त्यामुळे तो जवजवळ ४००० व्होल्ट्स एवढ्या प्रचंड विजेच्या संपर्कात आला होता. ही प्रचंड वीज त्याच्या शरीरात भिनून पायातून निघाली होती. त्याच्या पायाच्या अंगठ्याला छोटं छिद्रही पडलं होतं. परिणामी तो जागीच कोसळला. सुरक्षेसाठी असलेल्या पट्यांमुळे तो खाली न कोसळता हवेतच उलटा तरंगत राहिला. ह्या कामगाराचं नाव होतं रँडॉल. मोराबितोने हे दृश्य पाहिल्यानंतर आधी तर फोन करून तातडीने रुग्णवाहिका पाठवायला सांगितली. आणि त्यानंतर त्याने आपला कॅमेरा पुढे सरसाऊन फोटो काढायला सुरुवात केली.