पहिली मोहीम अयशस्वी झाल्यावर अमेरिकन मंडळी दुसरं ठिकाण शोधण्याचा मागे लागली. १९६६ साली नंदादेवी ऐवजी नंदकोट या शिखरावर सर्व्हेलन्स युनिट ठेवण्यात आले. पुन्हा एकदा प्रयत्न करून प्लुटोनियम बॅटरीसकट सर्व्हेलन्स युनिट एक आसरा तयार करून स्थापित करण्यात आलं. सर्वांनी एक सुटकेचा सुस्कारा सोडला. पण काही महिन्यातच ही यंत्रणा बंद पडली. पुन्हा एकदा मनमोहन कोहली फौजफाट्यासकट नंदकोटवर पोहचले. इथे त्यांच्यासाठी एक मोठे आश्चर्य त्यांची वाट बघत होते.
प्लुटोनियमच्या बॅटरीतून बाहेर पडणाऱ्या उष्णतेमुळे एक आठ फुटाचे गोलाकार विवर(अतिशय खोल खड्डा) तयार झाले होते. या विवराच्या तळाशी बॅटरी चालू होती, पण बाकी यंत्र सामग्री त्या विवरात कुठेतरी नाहीशी झाली होती. नंदकोटवरच्या या प्रकारावरून नंदादेवीवर असलेल्या प्लुटोनियम कॅप्सूल अशाच हिमालयाच्या गर्भात नाहीशा झाल्या असतील हा केवळ एकच अंदाज आता आपण करू शकतो. बाकी पुढची पाऊणशे वर्षं अशीच निर्धोक जातील हा केवळ आशावाद आता शिल्लक आहे.
या सर्व घटना बरीच वर्षं गुप्ततेच्या पडद्याआड गेल्या होत्या. पण १९७७ साली हे बिंग फुटले. अशा तर्कट साहसाचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात आला. संसदेत मोरारजी देसाईंनी हा अपघात झाल्याचे मान्य केले. आजही कुठेतरी उत्सर्जनाचे घड्याळ टिकटिकत असेलच!!!