एके काळी एका खात्यातून दुसर्या खात्यात पैसे पाठवण्याची सोय फारच लांबलचक होती. उदाहरणार्थ, एखाद्याने दिलेला चेक अमुक एका वेळेपर्यंतच जमा करावा लागायचा. मग तो चेक रिझर्व्ह बँकेच्या नॅशनल क्लिअरींग सेंटरला जायचा. त्यांच्याकडे क्लिअरींगचे पाच वेगवेगळे झोन असायचे. त्यानुसार चेक क्लिअर करण्यासाठी त्या-त्या बँकेकडे पाठवला जायचा. खात्यात पुरेसे पैसे जमा असले तर त्या खात्यात वजावट व्हायची. पैसे अपुरे असले तर तो चेक पुन्हा नॅशनल क्लिअरींग सेंटरच्या 'रिटर्न' क्लिअरींग झोनमध्ये परत पाठवला जायचा. म्हणजे चेक जमा केल्यानंतर चौथ्या दिवशी त्या पैशाचे भवितव्य कळायचे. या व्यवस्थेत पैसे खात्यात जमा होईपर्यंत श्वास अडकून राहायची वेळ यायची. त्यातून मध्ये सार्वजनिक रजा आल्या तर एक आठवड्याचा आरामच असायचा.
थोडक्यात, चार दिवस पैसे बँकेच्या सिस्टीममध्ये गुंतून रहायचे. चेक 'रिटर्न'आला की त्याचे कारण द्यावे लागायचे. त्यातून अफरातफरीची प्रकरणे व्हायची. काहीवेळा बँका अडचणीत यायच्या, तर काही वेळा ग्राहक! त्यातून जन्माला आला 'सेक्शन १३८', म्हणजे चेक परत आला तर तो गुन्हेगारीच्या कलमाखाली जायचा. त्याचे स्पेशल वकील तयार झाले.















