अनेकांना खूप काही काही करायची इच्छा असते. पण मग काहींच्या बाबतीत एक ना धड भाराभार चिंध्या असा प्रकार होतो. पण एक मुलगी धडाडीची उद्योजक आहे, फिल्ममेकर आहे, फोटोग्राफर आहे, तिच्या नावावर बर्पिज नावाच्या एक व्यायाम प्रकारातला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये विक्रम आहे, आणि ती आता अंध मुलांना फोटोग्राफी शिकवत आहे. वाचताना धाप लागली ना? ही सगळी कामं ही एक मुलगी करतेय.
दिल्लीची रिचा माहेश्वरी हिची ही गोष्ट!!! रिचा मूळची कानपुरची. तिचे वडील व्यवसायिक आहेत. लहानपणापासून फॅशनमध्ये आवड होती म्हणून तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला आणि इथून पुढे खऱ्या अर्थाने तिने नवनविन प्रयोग करायला सुरुवात केली.






