मध्यंतरी गोव्यात काळा चित्ता (Black Panther) दिसल्याची बातमी आली होती. त्याच्या काहीच दिवसांनी कर्नाटकच्या जंगलातील काळ्या चित्याचे अत्यंत सुंदर फोटो व्हायरल झाले होते. काळ्या चित्ता अत्यंत दुर्मिळ असल्याने तो कुठे दिसला की त्याची लगेच बातमी होती. आज आम्ही व्याघ्र प्रजातीतील अशाच एका दुर्मिळ प्राण्याची बातमी घेऊन आलो आहोत. काळ्या रंगाच्या वाघाची....हो, बरोबर वाचलं तुम्ही. काळ्या रंगाचा वाघ. तर कुठे आहेत हे काळ्या रंगाचे वाघ?
भारतात ओडीसा राज्यात हे दुर्मिळ वाघ पाहायला मिळाले आहेत. ओडीसामधील सिम्लीपाल टायगर रिझर्व्हमध्ये फोटोग्राफर सौमेण बाजापेयी ह्यांना ह्या वाघाचे दर्शन झाले. पक्ष्यांचे फोटो पाहण्यात दंग असताना अचानक झुडुपातून हा वाघ आला. दोन सेकंद थांबला आणि पुन्हा निघून गेला. ह्या २ ते ३ सेकंदात बाजपेयी ह्यांनी काढलेल्या वाघाच्या फोटोंनी लोकांना आश्चर्याचा एक सुखद धक्का दिला आहे.






