गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातल्या अनेक गावांचे रुपांतर छोट्या शहरांमध्ये होते आहे. एके काळी जिथे ग्रामपंचायती होत्या तिथे आता नगर परीषदा स्थापन झाल्या आहेत.गावाचे शहर झाले म्हणजे पाणी, रस्ते आणि इतर सार्वजनीक सुविधांचा विकास होत जातो. सोबतच विकसित होणाऱ्या नव्या शहरांच्या प्रगतीचे एक लक्षण म्हणजे शिक्षणसंस्थांचा विकास ! जुन्या गावात मोठ्या इमारती बांधायला जागा नसल्याने नव्याने येणार्या शाळा गावापासून दूर असतात. स्टेट बोर्ड, सीबीएसी बोर्ड, आयसीएसी बोर्ड प्रमाणे चालणार्या वेगवेगळ्या शाळा असतात.
विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते आहे. या सर्व मुद्द्यांचा विचार केला तर घर ते शाळा हा प्रवास हा फार महत्वाचा झाला आहे. वाढत्या रहदारीमुळे हा प्रवास जास्त लांब होत जातो आहे. त्यात नव्याने 'विद्यार्थ्यांची सामाजिक सुरक्षा' हा पण महत्वाचा विषय बनत चालला आहे. या सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार झाल्यानंतर विद्यार्थ्यांची ने आण करणार्या वाहतूक व्यवस्थेवर सुप्रीम कोर्टाने काही महत्वाचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक राज्यातील रोड ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीने नियमावली बनवली आहे. आज महाराष्ट्रात विद्यार्थ्यांची ने- आण करणार्या व्यवस्थेसाठी काय नियम आणि मार्गदर्शक तत्वे आहेत याचा विचार करू या !













