समाजात नकारात्मक गोष्टींपासून सकारात्मक गोष्टी काढणारे अनेक लोक दिसतात. पण सर्बियाच्या एका शिल्पकाराची गोष्टच वेगळी आहे. निकोला माक्युरा हा शिल्पकार शस्त्रांपासून चक्क वाद्ये बनवत असतो. हा अवलिया दिवसभर मिलिटरी जंकयार्डमध्ये सुरांच्या शोधात फिरत असतो. तिथे खराब झालेले रायफल तसेच इतर शस्त्रसामुग्री शोधून त्यांची पारख करतो. त्यातली काही सामग्री मग तो आपल्या स्टुडिओत घेऊन जाऊन त्यांच्यापासून संगीतातील साहित्य बनवत असतो.
शस्त्र शेवट करण्याचे काम करतात तर संगीत नवनिर्मितीसाठी ओळखले जाते. हा ४२ वर्षीय कलाकार याच शेवट आणि नवनिर्मितीचा धागा गुंफण्याचा प्रयत्न करत असतो. हा परिसर 90 च्या दशकात झालेल्या युद्धांच्या जखमा आजही विसरू शकत नाही. त्यावर काहीतरी फुंकर घालण्याचा आपला प्रयत्न असल्याचे निकोला सांगतो.






