शाळेत असताना कंटाळवाणा वाटणारा इतिहास नंतर त्यातला सुरस आणि चमत्कारिकपणा कळल्यावर एकदम इंटरेस्टिंग वाटायला लागतो. आजही आपण इतिहासातली काही पानं पुन्हा उलगडणार आहोत.
तर, १७०७ साली औरंगजेबाचा मृत्यू झाला. काही इतिहासकारांच्या मते भारताचा मध्ययुगीन इतिहास इथे संपतो. यानंतर मोगल साम्राज्य उतरणीला लागले आणि कंपनी सरकारच्या म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीच्या राजकीय वर्चस्वाचा उदय झाला. औरंगजेबानंतर गादीवर आलेले मोगल बादशाह दुबळे, अय्याश, चाळेखोर या शब्दांनी वर्णन करण्यासारखेच होते. कधी दुराण्यांच्या मदतीने, कधी ब्रिटिशांच्या सोबत हातमिळवणी करून, तर कधी मराठ्यांच्या संरक्षणाखाली या बादशहांनी आपली गादी टिकवून ठेवली. दरबारी राजकारणात वजीरांचे वर्चस्व वाढीस लागले. ब्रिटिशांच्या कावेबाज कारवायांना ऊत आला!
थोडक्यात, पातशाही संपली. नंतरचा इतिहास म्हणजे फंदफितुरी, विश्वासघात, दिवाळखोरी यांच्या कथांनी भरला आहे. महंमद शाह रंगीले ते वाजीद अली शाह असा हा इतिहासाचा पट आहे. यांपैकी सगळ्यात दुर्दैवी ठरलेल्या शाह आलम (दुसरा) या मोगल बादशहाचा इतिहास हा आज आपल्या लेखाचा विषय आहे. तख्तावर बसलेला बादशहा मनाने दुर्बळ - हतबुध्द असल्यावर इतिहास कसा बदलतो याची ही कथा आहे.











