पृथ्वीच्या पृष्ठभागावर कितीतरी अजबगजब प्रदेश वसलेले आहेत. यात अशीही काही ठिकाणं आहेत जिथली झाडे, पशु, पक्षी पाहिल्यावर आपण कुठल्यातरी वेगळ्या जगात तर आलो नाही ना असा प्रश्न पडेल. याच जगात राहून दुसऱ्या जगात गेल्याची अनुभूती तुम्हाला घ्यायची असेल तर हिंदी महासागरातल्या सोकोट्रा बेटाला भेट द्यायलाच हवी.
सोमालियापासून अवघ्या २५० मैल अंतरावरील हे बेट तसे इतर जगापासून काहीसे तुटलेलेच आहे. या ठिकाणी आढळणारी झाडे, त्यांचा आकार, रंग इतका वेगळा आहे की इतर ठिकाणी त्यासारख्या वनस्पती तुम्हाला कुठेच आढळणार नाही. आशिया खंडातील ‘गालापागोस’ अशीच या बेटाची ख्याती आहे.
जुन्या काळात समुद्र मार्गे व्यापार होत होता तेव्हा अनेक देशातील व्यापाऱ्यांसाठी हे एक थांब्याचे ठिकाण होते. भारतीय, इथिओपियन आणि दक्षिण अरेबियन व्यापाऱ्यांनी या बेटावरील मानवी इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या पुरातत्वशास्त्रज्ञांसाठी बऱ्याच खाणाखुणा सोडल्या आहेत. याउलट इजिप्त, ग्रीस आणि रोम व्यापाऱ्यांनी इथल्या आंतरिक पर्यावरणाला हानी पोहोचवल्याच्या खुणाही सापडतात.







